|
आम्ही समोर जाताक्षणी त्यांनी डोळे उघडले व मी त्यांच्यासमोर धरलेले सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे ते पुस्तक पाहून ते सत्पुरुष पुन्हा डोळे बंद करून एकदम थरथरायला लागले. अशी दोन तीन मिनिटं गेली. आम्ही सर्व शांतपणे त्यांच्यासमोर उभे होतो. त्यांनी डोळे उघडताच मी त्यांना म्हटले "आम्ही सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे भक्त आहोत व याठिकाणी त्यांचे नामस्मरण करण्यासाठी आलो आहोत. आम्हाला हे पुस्तक आपल्याला भेट द्यायचे आहे." त्यांचे थरथरणे अजुनही पूर्णपणे थांबले नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा त्या पुस्तकाकडे पाहिले व ते आम्हाला म्हणाले "मी यांना भेटलो." हे ऐकताच मी आश्चर्याने त्यांना विचारले "कुठे?" त्यावर ते शांतपणे उत्तरले "हे आत्ताच. मी जेव्हा स्नान करून मंदिरात आलो तेव्हा तुमचे नामस्मरण सुरू असताना हे खुर्चीत बसले होते. मी त्यांना नमस्कार केला व इथे येऊन बसलो." असे म्हणून त्यांनी आम्हाला प्रसाद म्हणून केळी देऊन पुन्हा डोळे बंद केले. सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे नामस्मरण चालू असताना ते स्वतः या खुर्चीवर विराजमान आहेत ही आमची श्रद्धा होतीच; नव्हे त्याची आम्हाला जाणीवही होती. तरीसुद्धा दुसऱ्या सत्पुरुषांच्या मुखातून हे ऐकताना आमचे मन आनंदाने भरून गेले.
श्रीक्षेत्र नरसोबा वाडीतील श्रीस्वामींचे प्रत्यक्ष दर्शन
सद्गुरु एकेक जिवंत अनुभूती देऊन आम्हाला कृतकृत्य करत होते. आम्ही मात्र फक्त त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करत होतो. आमचे पुढचे नामस्मरण होते श्रीक्षेत्र नरसोबा वाडी येथे. श्रीनरसोबा वाडी हे तमाम दत्तभक्तांचे माहेरघर म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. आमचे परात्पर गुरु श्रीस्वामी महाराज यांनी आपले जन्मस्थान माणगाव सोडल्यानंतर प्रथम नरसोबा वाडी येथेच वास्तव्य केले होते. येथे राहूनच त्यांनी दत्तभक्तीचा प्रसार केला. त्याचप्रमाणे, विशेष म्हणजे श्रीस्वामी महाराजांच्या दिव्य शिष्य परंपरेतील प. प. श्रीनृसिंहसरस्वतीदिक्षित स्वामी महाराज, श्रीरंगाअवधूत स्वामी, श्रीशिवानंद स्वामी अशा अनेक शिष्यांना त्यांनी श्रीनरसोबा वाडी येथेच अनुग्रह देऊन कृतार्थ केले. त्यामुळे या ठिकाणी प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे अवतारी स्वरूप असलेल्या सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे नामस्मरण संपन्न होणे यामध्ये विशेष औचित्य होते.
सद्गुरूकृपेने साक्षात श्रीनरसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या मनोहर पादुकांसमोर परमपूज्य भाऊ महाराजांचे नामस्मरण पार पडले. आरती झाली... आणि ईश्वराने जणू आमची सत्वपरीक्षा बघायचे ठरवले. सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या या कार्यामध्ये आम्हाला यापूर्वीही अनेक वेळा वेळेला अक्षरशः सत्वपरीक्षेच्या भट्टीतून जावे लागले आहे. त्यातून मार्ग दाखवणारे जरी सद्गुरूच असले तरी त्यावेळची मनाची अवस्था वर्णन करता येणे शक्य नाही. अशाच एका प्रसंगाला २००४ सालामध्ये आमच्या संपूर्ण कुटुंबाला सर्व बाजुंनी आलेल्या संकटांच्या मालिकेला तोंड द्यावे लागले होते. आमची मुलगी चि. पूजा ही त्यावेळी एकाआजारपणातून मरणाच्या दारातून वाचली होती. सद्गुरूंच्या कार्यामध्ये होत असलेल्या वाईट शक्तींच्या या प्रत्येक त्रासावर केवळ सद्गुरूंच्या अखंड नामाने व त्यांच्यावरील नितांत श्रद्धेने मात करतच आमची वाटचाल आजही चालू आहे.
श्रीनरसोबा वाडीमधील मुख्य मंदिरातील नामस्मरण संपताना माझ्या मुलीला अचानक तब्येतीचा त्रास होऊ लागला. एक वर्षांपूर्वीही असाच आमच्या मुलीच्या आरोग्याला व जीवाला मोठा धोका उत्पन्न झाला होता. तेव्हा नुकताच सद्गुरु भाऊमहाराजांनी देह ठेवला होता. सद्गुरु भाऊमहाराजांनी देह ठेवण्यापूर्वी काही महिने आम्हा दोघांना सांगितले होते की- " मी असेन किंवा नसेन, पण तुम्ही नियमितपणे खोपोली येथे परमपूज्य गगनगिरी महाराजांकडे जात राहा." त्यामुळे गुरुवर्य भाऊमहाराजांनी तुकाराम बीज, २००४ या दिवशी देहं ठेवण्यापूर्वी व त्यानंतरही आजतागायत त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही नियमितपणे खोपोलीला श्रीगगनगिरी महाराजांच्या दर्शनास जात राहिलो. त्यावेळी जेव्हा मुलीला त्रास झाला होता ; तेव्हा तिचे मेडिकल रिपोर्ट्स घेऊन आम्ही श्रीगगनगिरी महाराजांकडे गेलो होतो. त्यांनी दिलेल्या आशीर्वादयुक्त विभुतीमुळे तिच्या जीवाचा धोका टळला. आमच्या जीवनामध्ये केवळ सद्गुरू कृपेमुळे वेळोवेळी अनेक संत सत्पुरूषांनी आम्हाला आशीर्वाद देऊन उपकृत करण्याचे प्रसंग आले. आमच्यावर येणारी संकटे ही हे महत्तम असे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी झालेली निमित्तेच असावीत.
श्रीनरसोबावाडी येथे नामस्मरण यात्रेच्या वेळी जेव्हा तिच्या प्रकृतीला खूपच धोका जाणवू लागला, तेव्हा आम्ही दोघे काळजीत पडलो कारण; त्याठिकाणी तिला योग्य ते वैद्यकीय उपचार मिळणे तसे कठीण होते. शिवाय अजुन पुढे संपूर्ण यात्रा व्हायची होती. आमचे पुढचे नामस्मरण वाडी येथेच श्रीटेंबेस्वामी महाराजांच्या मठीमध्ये होते आणि संध्याकाळ झाल्यामुळे ते नामस्मरण वेळेत चालू करणे आवश्यक होते. आम्ही मुलीला एकटीलाच आमच्या १० वर्षाचा मुलगा चिन्मयच्या बरोबर खोलीवर जाऊन विश्रांती घेण्यास सांगितले आणि आम्ही नामस्मरण सुरू केले. श्रीस्वामींच्या मठीतील ते नामस्मरण इतके रंगले की नामस्मरण म्हणताना आणि ढोलकी व झांज वाजवताना आमचे देहभान हरपले. त्यावेळेपुरते आमची मुलगी आजारी आहे हे आम्ही दोघेही फार विसरून गेलो होतो.
नामस्मरण संपल्यानंतर आमची मुलगीच आम्हाला शोधत तिथे आली व तिने तिचा त्रास आणखीन वाढला असल्याचे सांगितले. आता तिच्या जीवालाही धोका होऊ शकत होता. आम्ही सद्गुरु आनंदयोगेश्वरांची प्रार्थना केली व त्यावेळी आम्हाला सद्गुरु अण्णा महाराजांचे शब्द आठवले की "कोणी गेले नाही, सगळे इथेच आहे." आणि "मी तुमच्याबरोबरच आहे. मला केव्हाही हाक मारा". म्हणून पिंगळी या ठिकाणी सद्गुरु श्रीअण्णा महाराजांना फोन लावला तेव्हा आम्हाला सद्गुरु श्रीअण्णा गोव्याला गेले असल्याचे समजले. तिथला फोन नंबर घेऊन सद्गुरु श्रीअण्णांना गोव्याला फोन केला आणि केला असता तिथून ते दुसरीकडे गेल्याचे समजले. तो फोन नंबर घेऊन तिथे फोन केला. बऱ्याच वेळाने परमपूज्य अण्णा महाराज फोनवर भेटले. आमच्या सगुण रूपातील या मार्गदर्शक सद्गुरूंना आम्ही आमच्या मुलीच्या आरोग्याची ही समस्या सांगितली आणि कळकळीने ही प्रार्थना केली की "आमची ही नामस्मरण यात्रा व्यवस्थित पार पडू द्या."
|