|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

आम्हाला वाटले होते की सद्गुरु अण्णा म्हणतील "काही काळजी करू नका. तुम्हाला या यात्रेमध्ये काही विघ्न येणार नाही." परंतु प्रत्यक्षात मात्र सद्गुरु अण्णा काही सेकंद काहीच बोलले नाही व नंतर कधी नव्हे ते अतिशय गंभीरपणे म्हणाले "तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमची नामस्मरणाची वारी सोडून मुंबईला जा आणि पूजाला लगेच डॉक्टरांना दाखवा." आता आम्हाला ब्रम्हांड आठवले; कारण ज्या अर्थी सद्गुरु अण्णांनी आम्हाला यात्रा सोडून लगेच मुंबईला निघण्यास सांगितले, त्याअर्थी आमच्या मुलीची समस्या नक्कीच गंभीर होती. आता काय करायचे? आमच्यासमोर धर्मसंकट उभे राहिले. आमची मुलगीही रडायला लागली. क्षणभर मनात विचार आला- सद्गुरु आमची परीक्षा घेत होते का?

सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या संकल्पातील नामस्मरणाची पुढे इचलकरंजी, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, गोवा अशी संपूर्ण यात्रा अजून व्हायची होती. पुढच्या भक्तांना आम्ही त्याप्रमाणे तारखा दिल्या होत्या. शिवाय सद्गुरूंची यात्रा अपूर्ण कशी सोडायची? आमच्याबरोबरच्या इतर भक्तांना पालखीला जायला सांगून आम्ही मुलीला घेऊन श्रीटेंबेस्वामी महाराजांच्या मठी मध्ये गेलो. खरोखरच डोळ्यात पाणी होते. गेली अनेक वर्षे मनात नेहमीच ही इच्छा असायची की सद्गुरूंकडे कधीही काहीही ऐहिक मागायचे नाही. 'ठेविले अनंतही तैसेची रहावे' यानुसार 'त्यांच्या कृपा छत्राखाली असेल त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहावे' हीच वृत्ती आम्ही दोघांनीही ठेवली होती.

याचा अर्थ परमेश्वररुपी सद्गुरूंकडे काहीच मागू नये असा नाही. परंतु आपल्याला आलेल्या एखाद्या समस्येवर उपाय करण्यासाठी गुरूंकडे गेल्यानंतर त्या समस्येचे सद्गुरु कृपेने निराकरण झाल्यानंतर ती समस्या ही आपल्याला या परमेश्वरीय तत्त्वापर्यंत आणणारे एक निमित्त होते असा दृष्टिकोन ठेवावा. दुसरी गोष्ट म्हणजे सद्गुरूंकडे आपण जे काही मागतो त्याची आपल्या जीवनात किती नितांत आवश्यकता आहे हे पाहूनच सद्गुरु त्या भक्ताची इच्छा पूर्ण करीत असतात. सद्गुरु आपल्या सद् भक्ताला काय हवे ते न देता त्याच्यासाठी काय योग्य आहे ते देत असतात. ऐहिक जीवनामधील या योग्य गोष्टी प्राप्त झाल्यानंतर कुठे थांबायचे हे त्या साधक भक्ताला कळणे अति आवश्यक असते. कारण सद्गुरु आपल्या जीवनामध्ये या ऐहिक गोष्टींची प्राप्ती करून देण्यासाठी नसतात; तर आपल्या साधक भक्ताला हा जीवनरुपी भवसागर पार करून त्याला पैलतीरी म्हणजेच भगवंत चरणी घेऊन जाण्यासाठी ते कृपाशीर्वादाने सिद्ध असतात. आपण मात्र आयुष्यभर त्यांच्याकडे नको त्या गोष्टी सतत मागत असतो ज्या खरोखरच अशाश्वत असतात अशी आमची ठाम धारणा आहे.

आमच्यासमोर जी समस्या आता उद्भवली होती ती केवळ आमच्या वैयक्तिक जीवनातील नव्हती; तर त्याचा संबंध आमच्या सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या कार्याशी होता, त्यांच्या नामस्मरण संकल्पाशी होता. म्हणूनच डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. श्रीटेंबेस्वामी महाराजांच्या मठीमध्ये ज्या ठिकाणी तासाभरापूर्वी सद्गुरूंचे नामस्मरण केले होते तिथेच त्यांच्यासमोर आम्ही बसलो. अतिशय कळकळीने त्यांना हाक मारली. मी मोठ्याने श्रीस्वामींना म्हणाले "माझी मुले ही या जन्मामध्ये केवळ नात्याने माझी मुले आहेत. प्रथम ती तुमची लेकरं आहेत, आम्ही सर्वस्वाने स्वतःला सद्गुरू चरणी समर्पित केले आहे. आता आमचे जे करायचे ते तुम्ही करा. या जन्मात जो जीव जन्माला येतो तो केव्हा तरी जाणारच. कोणी अचानक अपघाताने, तर कोणी आजारपणाने, तर आणखी कुठल्या निमित्ताने येणारा जीव हा मरणारच आहे. माझ्या मुलीला तुमच्या इच्छेने माझ्या सद्गुरूंचे 'नाम' घेताना मरण आले तर ते तिचे सद्भाग्यच आहे असे मी समजेन." माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होते. शेवटी मी श्रीस्वामींना निक्षून सांगितले की "माझ्या गुरूंच्या नामाला आणि कार्याला बोल लागता कामा नये. काही झालं तरी आम्ही ही नामस्मरण यात्रा अर्धवट सोडून जाणार नाही. या उपर सद्गुरूंची इच्छा."

त्यावेळी विशेष म्हणजे ज्या माझ्या मुलीवर हे संकट आले होते, ती सुद्धा श्रीटेंबेस्वामींच्या मठीमध्ये आल्यानंतर शांत झाली. आपल्या आईचे वरील उद्गार ऐकून तीही ठामपणे आम्हाला म्हणाली "आपण ही यात्रा सोडून मुंबईला जायचं नाही. माझा सद्गुरु भाऊ महाराजांवर, प.प. श्रीटेंबेस्वामी महाराजांवर आणि सद्गुरु अण्णांवर पूर्ण विश्वास आहे."

तत्पूर्वी, आम्ही जेव्हा सद्गुरु अण्णा महाराजांना गोव्याला फोन करण्यास गेलो होतो; तेव्हा त्या टेलिफोन बूथबाहेरच पुढे काय करायचे याविषयी आमचे बोलणे चालू होते. ते बोलणे त्या बूथवाल्याने ऐकले व तो आम्हाला म्हणाला "तुमच्यापुढे काहीतरी मोठी समस्या दिसते आहे. तुम्ही येथील वासुदेव निवासमधील श्रीगुरुप्रसाद यांना का भेटत नाही? ते तुम्हाला यातून नक्की काहीतरी मार्ग दाखवतील."

योगायोगाने या वासुदेव निवासमध्येच आम्ही उतरलो होतो. श्रीगुरुप्रसाद व त्यांचे वडील श्री. दिगंबर पुजारी उर्फ पपा यांच्याशी आमचा परिचय होता. त्यामुळे श्रीटेंबेस्वामींच्या मठीमधून त्यांना कळकळीने प्रार्थना केल्यानंतर आम्ही वासुदेव निवासमध्ये आलो. आमच्याबरोबरच्या इतर भक्तांना या सर्व गोष्टींची यत्किंचितही कल्पना नव्हती. त्यांना भोजन करण्यास बसवून आम्ही श्री. गुरुप्रसाद यांना भेटलो व त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी आमच्या मुलीला होणारा हा त्रास कशामुळे आहे हे बरोब्बर सांगितले; जे आम्हाला आधीही एक दोघांनी सांगितले होते. त्यांनी लगेच जाऊन मुख्य दत्तमंदिरांमधील श्रीपादुकांचे तीर्थ मुलीला देण्यास सांगितले व सद्गुरूंवरच पूर्ण विश्वास ठेवून पुढे चला असे सांगितले.

'सद्गुरूवरील ठाम विश्वास' हीच तर आमची पुंजी होती. आम्हाला घाबरायचे कारणच काय होते? आमच्या पाठीशी साक्षात श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, आमचे सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज, त्यांच्याच कृपेने लाभलेले सगुण रूपातील आमचे साक्षात शिवस्वरूप सद्गुरु श्रीअण्णा महाराज, त्याशिवाय श्रीशंकर महाराज, श्रीसाटम महाराज, श्रीसाईबाबा अशा अनेक विभूती होत्या आणि त्याची जाणीव आम्हाला होत होती. वर घडलेल्यापैकी काहीही आम्ही आमच्याबरोबर यात्रेमध्ये असलेल्या इतर भक्तांना सांगितले नाही व निश्चिंत मनाने आमच्या खोलीवर आलो. नाही म्हणायला, सर्व यात्रांमध्ये आमच्याबरोबर सावलीसारखा वावरणारा व अतिशय श्रद्धापूर्वक सद्गुरूंची सर्व नित्यसेवा करणारा आमचा गुरुबंधू प्रदीप याला या सर्व गोष्टी कळल्या. तोही काही न बोलता आम्ही सांगू ते करत होता. आमच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट खात होती- ती म्हणजे आम्ही आमच्या सद्गुरूंची, परमपूज्य श्रीअण्णांची आज्ञा मानली नव्हती. तो विचार मनात आला की आम्ही अस्वस्थ व्हायचो. या सर्व विचारांमुळे रात्री लवकर झोप लागली नाही.

<< Previous      Next >>