|
सकाळी थोडे उशिराच उठणे झाले. सद्गुरु भाऊ महाराजांना उठवून प्रदीपने नेहमीप्रमाणे सद्गुरु भाऊंसाठी व आमच्यासाठी वर खोलीमध्ये चहा आणला. एवढ्यात तिथे एक गृहस्थ आले. दरवाजा उघडाच होता. त्यांनी दरवाजातूनच "आत येऊ का" असे विचारले. त्यांच्या अंगात सदरा होता व ते धोतर नेसले होते. थोडी लांब पांढरी दाढी होती व चेहरा अतिशय प्रसन्न होता. आम्ही त्यांना "या" असे सांगणार तोच बाहेरूनच ते पुढे म्हणाले की "माझे नांव कुलकर्णी. मी इथे खाली एका मुंजीसाठी आलो होतो. तेव्हा एका गाडीवर या सत्पुरुषांचा फोटो पाहिला. मी यांना ओळखतो. म्हणूनच त्यांच्या दर्शनासाठी इथपर्यंत आलो. मी त्यांचे दर्शन घेऊ शकतो का?" आम्ही त्यांना आत बोलावले. आत येताच त्यांनी आम्हाला प्रश्न केला," तुमची स्नानादि कर्मे आटोपली का?"
आजच्या काळामध्ये एवढ्या शुद्ध भाषेमध्ये त्यांना बोलताना पाहून आम्हाला थोडे आश्चर्यच वाटले. त्यांनी पुढे होऊन सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या पादुकांवर मस्तक ठेवून नमस्कार केला व "थोडा वेळ बसू का?" असे विचारले. माझ्या मनामध्ये विचार चालू होता की "जेव्हा अण्णा विचारतील की तुम्ही मुंबईला का नाही गेलात, तेव्हा आपण काय उत्तर देणार?" असा विचार करीतच त्या गृहस्थांशी मी बोलत होते. ते गृहस्थ आमच्याशी आमच्या सद्गुरूंच्या कार्याविषयी बोलायला लागले तेव्हा मात्र आम्ही दोघेही जागरूक झालो. सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांकडे अंगुलीनिर्देश करीत ते म्हणाले- "यांचे नावच आनंदयोगेश्वर आहे; म्हणजे यांच्याकडे आल्यानंतर सर्वांना आनंद हा मिळणारच. आणि तुम्ही तर हा आनंद वाटत आहात. तुम्ही बघाच, आता हळूहळू पुष्कळ लोक तुमच्याकडे हा आनंद लुटायला येणार. मी पण तुमच्याकडे हा आनंद लुटण्यासाठी आलो आहे." असे म्हणून ते प्रसन्न हसले. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्याकडे बघत रहावेसे वाटत होते. एक प्रकारचे निराळेच चैतन्य त्यांच्याकडे बघताना, त्यांच्याशी बोलताना जाणवत होते. राहून राहून सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेणे आवश्यक आहे असे मन सांगत होते. पण 'मती गुंग होते' तसे झाले होते. त्यांचे स्मित हास्य काही वेगळेच होते.
मी त्यांना म्हटले "आम्ही दोघे नेहमी सद्गुरूंकडे एकच मागणी मागतो की - 'आम्हाला कुठेही चुकूनसुद्धा चुकू देऊ नका. तुम्हाला आमच्याकडून जे कर्म घडणे अपेक्षित आहे तेच तुम्ही घडवून घ्या.' म्हणून तुम्हाला विचारते की आम्ही योग्य रस्त्याने पुढे चाललो आहेत ना?"
यावर ते म्हणाले "समोर साखर असली की, ती गोड आहे म्हणून सांगावे लागत नाही. साखर ही गोडच असणार. तसंच तुमच्यामध्ये जो गोडवा आहे तो आहेच. कोणाला न सांगताही तो कळणारच." ते पुढे म्हणाले "कारले कडू असूनही ज्याला ते आवडते त्याला ते कडू लागत नाही. तसेच तुम्ही हे कार्य अतिशय आवडीने मनापासून करत असल्यामुळे यातील गोडव्याला अधिकच मिठास प्राप्त झाली आहे. आणि आता तुम्ही सर्वांतून पार झालात."
हे सर्व बोलणे होत असतानाच मोबाईलवर फोन आला. पहाते तर, तो गोव्याहून आलेला सद्गुरु अण्णांचा फोन होता. मी फोन घेताक्षणी सद्गुरु अण्णांनी विचारले "मुंबईला पोहोचलात मग?" मी घाबरतच त्यांना म्हटले "अण्णा, आम्ही अजुन वाडीमध्येच आहोत. आमची दोघांची, विशेषत: पूजाची पूर्ण श्रद्धा होती की सद्गुरु भाऊ आणि सद्गुरु अण्णा आपल्या पाठीशी असताना आपल्याला काहीही होणार नाही. आणि झालेच तर त्यांची इच्छा. त्याच विश्वासावर आम्ही यात्रा अर्धवट सोडायची नाही असा निर्णय घेतला. अण्णा, तुम्ही रागावला नाहीत ना?" सद्गुरुच ते! त्यांच्यापासून आमच्या मनाची कुठली अवस्था लपली होती! तरी मला वाटले होते की त्यांची आज्ञा न पाळण्याबद्दल ते रागावून काहीतरी बोलतील. पण घडले उलटेच. सद्गुरु अण्णा महाराजांनी चि. पूजाची चौकशी केली आणि "पुढची यात्रा नीटपणे पार पाडून पिंगळीला या" असे अतिशय प्रेमाने त्यांनी मला सांगितले.
फोन ठेवून मी खोलीमध्ये आले तर ते श्री. कुलकर्णी नांवाचे गृहस्थ खाली जमिनीवर बसून श्री. विकास यांच्याबरोबर चहा पीत होते. त्या दोघांबरोबर आमचा मुलगा चि. चिन्मय हा सुद्धा चहा पीत बसला होता. मला पाहिल्यानंतर ते मला म्हणाले "तुमच्या वाटचा चहा मी प्यायलो बरं का!" आणि पुन्हा तसेच वेगळेच स्मितहास्य त्यांनी केले. ते पुढे म्हणाले "काय? कोणाचा फोन होता? सगळं व्यवस्थित झालं ना!" काय म्हणून ते असे म्हणाले असतील? विचार मनामध्ये आला; पण बुद्धीपर्यंत पोचत नव्हता. ते पोचू देत नव्हते.
ते जायला निघाले. आम्ही तिघांनी त्यांना वाकून नमस्कार केला व त्यांना ७ सप्टेंबर या सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या ७५ व्या वाढदिवसाचे आमंत्रण दिले. ते म्हणाले "मी नक्की येणार." निघताना त्यांनी कोपऱ्यात ठेवलेली त्यांची काठी उचलली. ते पाठमोरे होऊन निघाले आणि ती हातात दंडा घेतलेली त्यांची आकृती पाहून एवढ्या वेळ बुद्धीवर आपोआप साचलेला मायेचा तवंग त्याक्षणी निघून गेला व आम्ही पूर्णपणे भानावर आलो. साक्षात प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आम्हाला दर्शन देऊन, आशीर्वाद देऊन गेले होते. आम्ही दोघेही दरवाजात सुन्न होऊन उभे होतो आणि तेवढ्यात श्रीस्वामी महाराजांचे भस्म आणायला गेलेला प्रदीप वर आला. मी त्याला विचारले, "प्रदीप, तू आता ज्या जिन्याने वर आलास; तिथे जिन्यात तुला जे भेटले ते कोण होते माहित आहे का?" तर तो आश्चर्याने म्हणाला, "मी कोणालाच खाली उतरताना पाहिले नाही." ते गृहस्थ गेल्यानंतर काही सेकंदातच प्रदीप वर आला होता. त्या वास्तूला वर किंवा खाली जाण्यासाठी तो एकच जिना होता. मग ते गृहस्थ प्रदीपला कसे दिसले नाहीत?
दुसरी अतिशय विस्मयकारक गोष्ट आमच्या लक्षात आली. ती म्हणजे आमच्या खोलीच्या बाजुच्या व समोरच्या खोलीमध्ये आमच्याबरोबर यात्रेला आलेले इतर स्त्री- पुरुष भक्त होते आणि आमचे या ना त्या कारणाने एकमेकांच्या खोलीमध्ये जाणे येणे सुरू होते. परंतु त्या ३०-३५ मिनिटांमध्ये आमच्या खोलीचा दरवाजा सताड उघडा असुनही कोणीही तिथे आले नाही आणि कोणालाही हे कळले नाही की इथे कोणी आले होते. आम्ही खाली गेलो तेव्हा तिथे दोन मुंजींना आलेली माणसे होती परंतु त्यात हे श्री. कुलकर्णी नावाचे गृहस्थ कुठेच दिसले नाहीत. त्यांनी निघताना आमच्या सांगण्यावरून त्यांचा पत्ताही आम्हाला आमच्या वहीत आमच्यासमोर लिहून दिला होता. परंतु नंतर ते पान त्या वहीमध्ये कुठेही दिसले नाही.
|