|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

त्यानंतर जेव्हा श्री नरसोबावाडी होऊन निघताना आम्ही पुन्हा श्रीस्वामी महाराजांच्या मठीमध्ये गेलो; तेव्हा आमचा १० वर्षाचा मुलगा चि. चिन्मय उद्गारला, "बाबा, मघाशी आलेले ते आजोबा असेच होते ना?" आमच्या दोघांच्याही मनात एकाच वेळी चाललेल्या विचाराला त्या लहान मुलाने शब्दरूप दिले होते. आमच्या डोळ्यात पाणी तरळले आदल्या दिवशी आमच्या परात्पर गुरूंना, श्रीटेंबे स्वामींना, कळकळीने केलेली प्रार्थना आठवली. प्रत्यक्ष दर्शन दिलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद स्वामी महाराजांचे ते दिव्य रूप आम्ही पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांचे रूप, त्यांचा पोशाख, त्यांचे शुद्ध ब्राह्मणी बोलणे, त्यांचे ते स्मित हास्य, त्यांची दंडा सदृश काठी, सर्व सर्व जसेच्या तसे आमच्या नजरेसमोर आजही उभे आहे. त्या श्रीस्वामी महाराजांच्या मठी मध्ये उभे असताना आदल्या दिवशीचा सर्व भवतापही आठवत होता. केवळ आणि केवळ सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांच्याप्रति समर्पणयुक्त भक्तीमुळे जन्मोजन्मीचे पुण्य फळाला आल्याची मला प्रचिती मिळाली होती. ज्या परमेश्वराच्या एका कृपाकटाक्षासाठी साधु पुरुष वर्षो न् वर्षे हिमालयात जाऊन साधना आणि तप करतात; त्याचे प्रत्यक्ष दर्शन आणि आशीर्वाद आम्हाला फक्त एका गुरुभक्तीमुळे प्राप्त झाले त्या सद्गुरुंबद्दल आज मुखातून फक्त हे ३ शब्द निघतात - "तुसी ग्रेट हो!"

त्रैमूर्ती राजा गुरु तोचि माझा

श्री नरसोबा वाडी येथून आम्ही श्री क्षेत्र अमरापुर येथे श्रीस्वामी महाराजांचे परमशिष्य प. प श्रीनृसिंहसरस्वती दिक्षित स्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या 'श्रीवासुदेवानंददत्तमरेश्वर' या पवित्र स्थानाचे दर्शन घेतले. श्रीगुरुचरित्र या महाग्रंथांमध्ये वर्णन केलेला घेवड्याचा वेल श्रीगुरुकृपेने ज्याठिकाणी फोफावला होता; त्या तीर्थाचे दर्शन घेतले व इचलकरंजीला सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या एका जुन्या परंतु आंतरिक भक्ती करणाऱ्या एका भक्ताकडे नामस्मरणाला गेलो. त्यांचे नाव श्रीमती नेहा भिडे.

सद्गुरूंकडून घडलेल्या लहानात लहान कृतीत सुद्धा केवढा अर्थ असतो याची प्रचिती या नामस्मरणाच्या निमित्ताने आम्हाला आली. आधी नमूद केल्याप्रमाणे सद्गुरू भाऊ महाराज दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ओम सद्गुरु प्रतिष्ठान या श्रीस्वामी महाराजांच्या पादुका स्थानावर, सूर्योदय ते सूर्यास्त असे १२ तासांचे नामस्मरण करीत असत. यावेळी ते स्वतः सूर्योदयाला वीणा घेऊन नामस्मरण सुरू करीत व त्यानंतर तीन-चार तास ते त्यांच्या खोलीमध्ये असत. मी व माझे पती श्री. विकास अनेक वर्षे दर शनिवारी सूर्योदयाला त्या ठिकाणी जात असू. सद्गुरू भाऊमहाराज तल्लीन होऊन नामस्मरण करीत असताना श्री. विकास हे ढोलकी वाजवत असत. त्यानंतर श्री. विकास सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ऑफिससाठी निघून जात व मी सद्गुरू भाऊ महाराज निघेपर्यंत स्थानावर थांबत असे.

या वेळामध्ये मला खूप वेळा सद्गुरू भाऊमहाराजांच्या खोलीत बसून त्यांच्याशी अनेक निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारायचा योग आला. मात्र गुरुवर्य भाऊंनी स्वतः आत बोलल्याशिवाय मी कधीही त्यांच्या खोलीत गेले नाही. गुरुवर्य भाऊ महाराजांबरोबरच्या या सर्वात्मक गप्पा व सहवास ही माझ्या संपूर्ण आयुष्याची शिदोरी आहे. यातून काय नाही दिले त्यांनी मला? बऱ्याचदा मी समोर बसलेले असताना त्यांना भक्तांचे फोन यायचे. कोणाच्या वैयक्तिक समस्या असू शकतात, अशा विचाराने मी बाहेर जाऊ लागले किती खुणेनेच मला बसायला सांगायचे. त्या वेळी मला समजले- "ही सद्गुरूंची वरून मऊ वाटणारी गादी साधी नाही. या मखमली गादीखाली तप्त निखारे आहेत; जे कोणालाच दिसत नाहीत" असे सद्गुरू भाऊमहाराज का म्हणायचे!

एकदा तर मी त्यांना दहा मिनिटात ५-६ वेगवेगळ्या बाबतीत भक्तांशी बोलताना ऐकले आहे की, सामान्य माणूस आपल्या मनाचा आणि बुद्धीचा तोल (टेंपरामेंट) असे ठेवूच शकणार नाही. एक फोन - "भाऊ, मूलबाळ होत नाही. काय करू?" अशा समस्येने ग्रस्त असलेला तर दुसरा फोन - "भाऊ, तुमच्या कृपेने मुलगा झाला" अशी आनंदाची बातमी देणारा. एक फोन - "भाऊ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर त्याच मुलीशी लग्न जमलं हो" असं सांगणारा तर दुसरा घटस्फोटाच्या समस्येवर तोडगा मागण्यासाठी केलेला. एक नोकरी मिळाली म्हणून तर एक नोकरी मिळत नाही म्हणून. बाप रे! आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रत्येकाशी बोलताना गुरुवर्य भाऊंचा आवाज आणि स्वर त्या त्या बातमीप्रमाणे असायचा. आणि त्यानंतर सर्वांनाच आशीर्वादपूर्वक सांगितलेले ते तीन शब्द "चिंता करू नकोस."

ते सद्गुरु माऊली होते म्हणूनच तर आपल्या प्रत्येक लेकराशी प्रेमाने बोलून त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना कधीही फोन बाजूला काढून ठेवलेला किंवा "थोड्या वेळाने फोन कराल का?" असे सांगताना ऐकले नाही. इतके ते भक्तकल्याणासाठी तत्पर असायचे आणि ते ही कुठल्याही वेळेला. हे सर्व मी या शनिवारच्या नामस्मरणाच्या निमित्ताने जवळून पाहिले, अनुभवले आहे.

सद्गुरूंना प्रत्यक्ष भेटण्यासाठीही त्यावेळी अनेक लोक येत. असेच एकदा श्री. विकास ऑफिससाठी निघून गेल्यानंतर मी स्थानावर नामस्मरणासाठी बसले असताना सद्गुरूंनी कोणालातरी सांगून मला त्यांच्या खोलीमध्ये बोलावून घेतले. मी आत गेले; तर सद्गुरू भाऊमहाराजांसमोर एक बाई बसल्या होत्या. सद्गुरु भाऊंनी आमची एकमेकींशी ओळख करून दिली. त्यांचे नाव सौ नेहा भिडे होते. श्री भाऊमहाराज मला म्हणाले, "हिचा अनुभव ऐकण्यासाठी तुला आज बोलावले आहे. सर्व प्रतिकूल परिस्थितीवर केवळ सद्गुरुंवरील नितांत श्रद्धेच्या बळावर हिने यशस्वीपणे मात केली आहे." त्यानंतर सौ. भिडे यांनी मला त्यांची सर्व हकीकत इत्यंभूतपणे कथन केली. त्यांच्या शब्दाशब्दातून परमपूज्य भाऊंवरील त्यांचा दृढ विश्वास प्रतीत होत होता. हे सर्व ऐकताना वाटत होते की 'गुरूभक्ती करावी तर अशी. सर्व काही झोकून देऊन.'

आम्ही जवळजवळ तासभर आतमध्ये सद्गुरुंबरोबर होतो. सद्गुरु भाऊंनी मला त्यांचा पत्ता लिहून घेण्यास सांगितले. बास. त्यांची आणि माझी एवढीच एका तासाची ओळख आणि ती सुद्धा सद्गुरु भाऊंनी करून दिलेली. या ओळखीचा पुढे अनेक वर्षांनी काही संबंध येईल असे आम्हा दोघींनाही वाटले नव्हते. पण मघाशी म्हंटलं ना 'सद्गुरूंकडून घडलेल्या लहानात लहान कृतीत सुद्धा पुष्कळ अर्थ असतो'. गेल्या वर्षी श्रीगजानन आशीषच्या एका अंकांमध्ये मी आनंदयोगेश्‍वर सद्गुरु निळकंठ महाराजांवर एक लेख लिहून दिला होता. योगायोगाने तो अंक इचलकरंजी येथे याठिकाणी श्रीमती नेहा भिडे यांच्या वाचनात आला. त्यातील ध्यानी मनी नसताना आपल्या सद्गुरूंचा फोटो व लेख पाहून त्यांना गहिवरून आले. त्या लेखामध्ये शेवटी सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या पंचाहत्तराव्या जयंतीवर्षाप्रित्यर्थ केल्या गेलेल्या '७५ नामस्मरण' संकल्पाविषयी लिहिले होते. त्याचप्रमाणे माझे नांव व सद्गुरूंच्या पादुका स्थानाचा संपूर्ण पत्ता आणि टेलिफोन नंबर होता. श्रीमती भिडे यांना ते नाव ओळखीचे वाटले व थोडा विचार करता केल्यानंतर त्यांना आठवण झाली की अनेक वर्षांपूर्वी सद्गुरु भाऊमहाराजांनीच आमची भेट घालून दिली होती.

<< Previous      Next >>