|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

लागलीच त्यांनी मला मुंबईला फोन केला. प्रथमतः इचलकरंजीवरून फोन करणारी नेहा भिडे कोण हे माझ्या लक्षात येईना. परंतु त्यांनी अनेक वर्षांपूर्वी सद्गुरू भाऊमहाराजांच्या खोलीत घडलेल्या भेटीची आठवण करुन देताच त्यांचा चेहरा लख्खपणे माझ्या नजरेसमोर आला. त्यांनी एका वर्षापूर्वीच त्यांचे पती निर्वतल्याचे सांगितले आणि मला जाणीव झाली की खरोखरच या बाईंचा वनवास अजून संपलेला नाही. अध्यात्माच्या वाटेवरचे काटे कोणाला चुकले?

त्या फोनवरच त्यांनी जीवश्चकंठश्च मैत्रीण भेटल्याप्रमाणे माझ्याशी सुखदुःखाच्या गप्पा मारल्या व "जेव्हा तुम्ही या बाजूला याल तेव्हा माझ्याकडे सद्गुरु भाऊ महाराजांचे नामस्मरण करायचेच" असे मला प्रेमाच्या अधिकाराने सांगितले. ज्यावेळी आमची नरसोबावाडीची यात्रा ठरू लागली त्यावेळी मी त्यांना तसे कळवले व श्री क्षेत्र अमरापूर वरून थेट इचलकरंजीला त्यांच्या घरी आलो. आपण सामान्य माणसं 'एका दगडात दोन पक्षी' असे म्हणतो पण सद्गुरु मात्र एकाच घटनेतून त्यांना अभिप्रेत असलेल्या अनेक गोष्टी घडवत असतात.

भिडे कुटुंबीयांनी सद्गुरु भाऊ महाराजांचे आणि आम्हा सर्व भक्तांचे अतिशय प्रेमाने स्वागत आणि आदरातिथ्य केले. त्यांच्या घरी नामस्मरण संकल्पातील ४९ वे नामस्मरण अतिशय रंगतदार झाले. त्यावेळी त्या ठिकाणी आम्हाला श्रीटेंबे स्वामी महाराजांच्या दोन आशीर्वादपर गोष्टींचा लाभ झाला. ज्यावेळी आम्ही या यात्रा काढण्याचा निर्णय घेतला; त्यावेळी आमच्या मनामध्ये अजून एक संकल्पना होती. ती म्हणजे -आमच्या सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या परम पावन अस्थींचे विसर्जन ज्या पाच तीर्थक्षेत्री झाले त्या प्रत्येक ठिकाणी हे संकल्पातील नामस्मरण करायचे व तेथील तीर्थ प्राशन करायचे. सद्गुरु भाऊमहाराजांच्या अस्थी श्रीक्षेत्र गाणगापूर, श्रीक्षेत्र नरसोबावाडी, श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्रीक्षेत्र गरुडेश्वर अशा ५ ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या होत्या. आम्ही काढलेल्या एकूण ४ चार यात्रांमध्ये वरीलपैकी श्रीक्षेत्र नरसोबा वाडी, श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या तीन ठिकाणी आम्ही नामस्मरणे करून त्या तीर्थराजाचे तीर्थ प्राशन केले. परंतु वेळेअभावी आम्ही श्रीक्षेत्र गाणगापूर व श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथपर्यंत पोचू शकलो नाही.

पण..........

भक्तांच्या शुध्द संकल्पांची सिद्धी करण्याची सर्व जबाबदारी सद्गुरू आपल्या शिरावर घेत असतात. श्रीसद्गुरूंच्या तपश्चर्येचे बळ सत्शिष्याच्या पाठीशी असते. पण हे सर्व कधी ? ज्यावेळी साधक आपल्या सर्व गोष्टी सर्वस्वी आपल्या सद्गुरूंवर सोपवित असतो त्यावेळीच हे सर्व शक्य होते. आम्ही श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथपर्यंत जाऊ शकणार नाही हे आमच्या गुरुमाऊलीला आधीच माहित असणार . श्रीमती भिडे यांच्या घरी एक वयस्कर गृहस्थ आले होते. ते वारकरी संप्रदायातील असून उत्तम प्रवचनकार होते. अर्थाअर्थी त्यांचा आणि श्रीटेंबे स्वामीमहाराजांचा काहीच संबंध नव्हता. परंतु त्यांचे एक स्नेही आदल्या दिवशीच श्रीक्षेत्र गरुडेश्वरहून आले होते. त्यांनी त्यांच्यासाठी आणलेले श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथील तीर्थ या गृहस्थांनी श्रीमती भिडे यांच्या घरी एका बाटलीतून आणले व सद्गुरू भाऊमहाराजांचे नामस्मरण झाल्यावर आम्हा सर्व भक्तांना दिले. ज्या ठिकाणी प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी १९१४ सालामध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदेला आपला देहं श्रीनर्मदा नदीमध्ये विसर्जित केला व ज्या ठिकाणी त्यांचेच अवतारी कार्य केलेल्या सद्गुरू निळकंठ महाराजांच्या परमपावन अस्थींचे विसर्जन केले गेले; त्या श्रीक्षेत्र गरुडेश्वर या तीर्थराजाचे तीर्थ आमच्यापर्यंत पोचले व अशाप्रकारे सगुरूंनीच आमच्या मनातील संकल्प पूर्ण केला.

नि:स्वार्थ बुध्दीने गुरुसेवा करणाऱ्या भक्तासाठी सद्गुरू काहीही करू शकतात आणि एका दगडात अनेक पक्षी मारू शकतात. या सर्व नामस्मरण यात्रा संपल्यानंतर व सद्गुरू आनंदयोगेश्वरांचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर, जून महिन्याच्या सुरुवातीला मला श्री. जयंत आंबर्डेकर या 'मृगया' मासिकाच्या संपादकांचा फोन आला. ते म्हणाले "या वेळचा दिवाळी अंक श्री टेंबेस्वामी महाराजांवर काढण्याचा माझा विचार आहे. मला तुमचे सद्गुरु भाऊ महाराजांवरील अनुभवाचे पुस्तक आवडले. त्यामुळेच मला तुम्हाला असे विचारायचे होते की तुम्ही या दिवाळी अंकासाठी श्री स्वामी महाराजांवरील एखाद्या विषयावर लिहू शकाल का?" मला क्षणभर काही सुचले नाही. कारण सद्गुरु भाऊ महाराजांना मी जवळजवळ पंधरा वर्षे जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्यावर थोडेफार लिहिणे हे मला शक्य होते. परंतु ज्यांना मी कधी प्रत्यक्षात पाहिले नाही अशा श्री टेंबेस्वामी महाराजांविषयी लिहिण्याची माझी योग्यता नाही हे मी जाणून होते. तरी कोणी बुद्धी दिली कोणास ठाऊक! मी त्यांना म्हणाले "मी टेंबेस्वामी महाराजांची 'शिष्य परंपरा' याविषयी लिहिण्याचा प्रयत्न करते."

<< Previous      Next >>