|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

झाले. श्री आंबर्डेकरांनी मला दोन महिन्यांचा भरपूर मोठा अवधी दिला होता. पण सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या ७५व्या जयंतीच्या सर्व तयारीमध्ये बहुतांशी वेळ जात असल्यामुळे; त्या दोन महिन्यातील एक महिना कसा निघून गेला मला कळलेच नाही. आज सुरुवात करू, उद्या करू असे करेपर्यंत शेवटचे १५/२० दिवस उरले. आता मात्र माझी धावपळ सुरू झाली. अनेक ठिकाणाहून मी मला माहिती असलेल्या शिष्यांची चरित्रे आणली. श्री टेंबेस्वामींची शिष्यपरंपराही त्यांच्या इतकीच दिव्य आहे याची मला कल्पना होती; परंतु प्रत्यक्षात एकेका शिष्याचे चरित्र वाचता वाचता माझ्या अंगावर काटा आला. धन्य ते गुरु आणि धन्य त्यांचे शिष्य!

आता मला मनोमन वाटू लागले की श्री. आंबर्डेकरांना श्रीस्वामी महाराजांविषयी लिहिण्यासाठी आणखी कोणीही चांगला लेखक वा लेखिका मिळाले असते. मग माझ्यापर्यंत हे यायचे कारण काय? विचार केला आणि लक्षात आले की- 'शिष्य कसा असावा' याचे यथार्थ ज्ञान देण्यासाठी म्हणूनच माझ्या सद्गुरूंनी हे घडवले. या लेखाच्या निमित्ताने माझ्याकडून माझ्या परात्पर गुरूंच्या सर्व शिष्यत्तमांच्या चरित्राचा थोडाफार अभ्यास त्यांनी करून घेतला, असे मला वाटते.

सद्गुरु काय गमतीजमती करतात पहा! प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या दिव्य शिष्यप्रभावळीतील एक - श्री दत्तमहाराज उर्फ श्रीनरहरीमहाराज वासुदेवराव दिवाण हे होत. त्यांचे चरित्र व त्यांच्या विषयीची माहिती मला कुठेच मिळेना. योगायोगाने प.प. टेंबे स्वामी महाराजांचे चरित्र रुपी खंड लिहून त्यांची पूर्ण माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवणारे सद्गुरु परमपूज्य डॉ. केशवराव जोशी महाराज यांचे काही अनुग्रहित भक्त साधक आमच्या परिचयाचे होते. त्यापैकी सौ. सुलभा मावशी शिंदे यांच्याकडे मला श्रीदिवाणमहाराजांचे चरित्र मिळाले नाही. त्यामुळे मी परमपूज्य डॉ. जोशी महाराजांचे दुसरे एक साधक भक्त श्री. रायकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना या विषयी विचारले. सुदैवाने त्यांच्या कडे चरित्र होते. श्री रायकर आम्हाला अगदी घाईगडबडीत ते पुस्तक देण्यासाठी आले. "थोडा वेळ बसा" असे सांगितल्यावर ते म्हणाले "जरा घाईत आहे. उद्याच मी श्री क्षेत्र गाणगापूर आला जात आहे" हे ऐकल्यानंतर आम्हा दोघांना अतिशय आनंद झाला. असे वाटले की सद्गुरूंनी त्यांना गाणगापूरला जाण्याआधी काही निमित्ताने येथे पाठवले आहे. कारण आदल्याच दिवशी श्री. विकास मला म्हणाले होते की, "श्रद्धा, मला वाटते सद्गुरू भाऊ महाराजांचा पंचाहत्तराव्या जयंती सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी श्री क्षेत्र गाणगापूर येथे गा-हाणे घालावे. पण आता वेळ एवढा कमी आहे की आपल्याला इतक्या लांब जाणे शक्य नाही. ठीक आहे. सद्गुरूंची इच्छा."

आम्ही लगेच त्यांना श्री. रायकर यांना गाऱ्हाणे यांनी लिहून दिले व श्री क्षेत्र गाणगापूर येथे सद्गुरू भाऊ महाराजांच्या नावाने अभिषेक करण्यास सांगितले. सर्व घटना अगदी सहज घडल्या सारख्या वाटतात; पण नीट विचार केला तर लक्षात येते की- सद्गुरूंनी घडवून आणलेल्या या सर्व घटनांमध्ये एक लय आहे, सुसूत्रता आहे. त्यानंतर, श्री क्षेत्र गाणगापूरहून आल्यावर श्री रायकर यांनी आमच्या घरी येऊन तिथला प्रसाद व एका बाटलीमध्ये श्री क्षेत्र गाणगापूर येथील श्रीदत्तपादुकांचे तीर्थ आम्हाला आणून दिले; तेही एका गुरुवारी. त्यादिवशी श्री क्षेत्र गाणगापूर तीर्थराजाच्या या तीर्थाबरोबरच सद्गुरु आनंदयोगेश्वर यांच्या अस्थी विसर्जनाच्या पाच तीर्थराजांच्या दर्शनाचा आम्ही मनोमनी केलेला संकल्प सद्गुरूंनी आणि केवळ सद्गुरूंनी अशा प्रकारे पूर्ण केला. इचलकरंजी येथे श्रीमती भिडे यांच्या निवासस्थानी एक श्री. बापट नावाचे वयस्कर गृहस्थ आले होते. त्यांना सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे आम्ही केलेले नामस्मरण अतिशय आवडले. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी सद्गुरु आनंद योगेश्वर यांच्या पादुका घेऊन येण्याची विनंती केली. खरं म्हणजे आमचा कार्यक्रम इतका भरगच्च होता की वेळेअभावी त्यांच्याकडे जाणे शक्य वाटत नव्हते. परंतु सद्गुरूंना जे घडवायचे असते ते ते बरोब्बर घडवतात. श्रीमती निलाताई आम्हाला म्हणाल्या की - "यांच्या घरी श्री दीक्षित स्वामी महाराज अनेकदा यायचे आणि एकदा त्यांच्याकडे श्रीटेंबे स्वामी महाराज व श्री दीक्षितस्वामी महाराज हे दोघे गुरु शिष्य आले होते. त्यावेळी श्रीटेंबे स्वामी महाराज ज्या पाटावर बसले होते तो त्यांनी अजूनही जतन करून ठेवला आहे. तुम्ही तिथे अवश्य दर्शनासाठी जा."

एवढी मोठी संधी आम्ही कशी सोडणार? आमच्या परात्पर गुरूंनी प्रत्यक्ष वापरलेल्या वस्तूचे दर्शन घेणे ही आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट होती. आम्ही श्री. बापट यांच्या घरी गेलो. ज्या पाटावर श्रीवासुदेवानंद स्वामी महाराज विराजमान झाले होते त्या पाठावर सद्गुरु भाऊ महाराजांच्या पादुका ठेवून या अनोख्या गुरु शिष्य भेटीचा अनुभव आणि आनंद आम्ही घेतला.

<< Previous      Next >>