|
सद्गुरूंचे सर्व ठिकाणी श्रद्धाभावाने स्वागत
इचलकरंजी मध्ये आमच्या गुरु भगिनी श्रीमती नेहा भिडे यांच्याकडील सत्संगाचा लाभ घेऊन आम्ही कोल्हापुरात आलो. तेथे श्रीमहालक्ष्मीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो असताना आमच्या ध्यानीमनीही नसताना तेथील पुजाऱ्याने आम्ही मंदिरामध्ये नेलेला सद्गुरु आनंदयोगेश्वरांचा फोटो व पादुका आत गाभाऱ्यात श्री महालक्ष्मी जवळ ठेवल्या व आम्ही कृतकृत्य झालो. श्रीमहालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आम्ही श्री किरण हवालदार या श्री समर्थ अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परमभक्ताकडे गेलो.
'सद्गुरु आनंदयोगेश्वर...,..... एक साक्षात्कारी अनुभूती' या पुस्तकाचा पहिला भाग वाचल्यानंतर श्री किरण हवालदार यांनी त्यावरील आमचा फोन नंबर पाहून आम्हाला फोन केला व त्या पुस्तकाच्या आणखी काही प्रती; तसेच सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे लहान फोटो आमच्याकडून मागवून घेतले. गेले अनेक महिने ते केवळ फोनवरून आमच्या संपर्कात होते. त्यांनी आम्हाला त्यांच्याकडील श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे काही साहित्य पाठवले. त्यांच्याकडून आमच्यापर्यंत आलेली सर्वात विशेष व महत्त्वाची गोष्ट म्हणजे प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या हस्ताक्षरातील 'अघोर संकटनाशन स्तोत्राची प्रत'. त्यांनी कोल्हापूर येथून पाठवलेली ही प्रत आम्हाला नेमकी गुरुवारीच मिळाली. आपल्या सद्गुरू विषयीची एखादी गोष्ट विकत घेणे आणि ती आपणहून आपल्यापर्यंत येणे यात पुष्कळ फरक असतो.
एकमेकांना चेहऱ्याने ओळखत नसूनसुद्धा केवळ फोनवरच आम्हा सद्गुरूंच्या भक्तांचे एकमेकांशी आत्मिक ऋणानुबंध निर्माण झाले. जेव्हा फोनवरील आमच्या संभाषणातून त्यांना कळले की आमची नामस्मरण यात्रा कोल्हापूर मध्ये येणार आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या घरी हे नामस्मरण करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही फोनवरच श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या आवारामध्ये भेटण्याची जागा निश्चित केली. 'एकमेकांनी कुठल्या प्रकारचे कपडे घातले आहेत' या खुणेने आम्ही नियोजित स्थळी जेव्हा भेटलो; तेव्हा आम्हा सर्वांनाच फार आनंद झाला. कुठलीही ओळख पाळत नसताना त्यांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमचे त्यांच्या घरी अतिशय छान स्वागत केले. 'त्यांचे घर' असे म्हणणे चुकीचे ठरेल; कारण त्या ठिकाणी वरच्या एका माळावजा खोलीमध्ये त्यांनी साक्षात श्रीस्वामी समर्थांचा मठच आपल्या श्रद्धेतून उभा केला आहे. तिथे श्रीस्वामींचा भक्त परिवार एकत्र येऊन त्यांची उपासना करत असतात.
त्यांच्या घरी इथे जाईपर्यंत आम्हाला कल्पनाच नव्हती की; या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची एवढी चैतन्यमय स्पंदने असतील. परंतु 'भाव तेथे देव' हे अगदी बरोबर म्हटले आहे. त्यासाठी मोठी जागा लागत नाही, खूप पैसा लागत नाही की खूप मनुष्यबळ लागत नाही. आपल्या अंतर्मनातील साधा भोळा भावच त्या परमेश्वराला भुलवतो व तो अशा भाविक मंडळींच्या श्रद्धास्थानी येऊन वास्तव्य करतो - हा अनुभव आम्ही श्री. किरण हवालदार यांच्या या भावमंदिरात घेतला. त्यामुळेच या श्रीस्वामी समर्थांच्या स्थानावर सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे नामस्मरण विशेष खुलले कारण तिथे उपस्थित असलेले सर्वजण सद्गुरु भक्तीने प्रेरित झालेले होते. सर्वांच्याच देहं मनामध्ये एका गुरु भक्तीची ज्योत तेवत होती.
श्री किरण हवालदार यांच्या अध्यात्मिक कार्याची वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे ते मिळेल त्या सत्पुरुषांची पुस्तके व चरित्रे यांचा संग्रह करून इच्छुक मुमुक्षु साधकांना ती विनामूल्य वाचण्यास देतात. अशी अनेक पुस्तके व ग्रंथ आम्ही त्यांच्याकडे संग्रह केलेली पाहिली. त्या सर्व साधक भक्तांनी सद्गुरु भाऊ महाराजांचे व आमचे अतिशय प्रेमाने आदरातिथ्य केले. रात्रीचे प्रसाद भोजन आम्ही त्यांच्याकडेच घेतले. अशी सद्गुरुंच्या इच्छेने माणसे जोडत जोडत आम्ही रात्री एक वाजण्याच्या सुमारास आमच्या पुढच्या मुक्कामी म्हणजे बेळगांव येथे पोहोचलो.
या सर्व यात्रांमध्ये सद्गुरूंनी आमची भोजनाची व निवासाची अशी सोय केली होती की आम्हाला एकद प्रसंग वगळता कुठेही बाहेर हॉटेलमध्ये जेवावे लागले नाही. सर्वांनी सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे व पर्यायाने आम्हा सर्व भक्तांचे प्रेमपूर्वक स्वागत केले. बेळगांव येथेही श्री अर्जुन वाडकर कुटुंबाने आम्हाला प्रेमाने जिंकून घेतले. हे संपूर्ण कुटुंब श्री कलावती आईंचे साधक भक्त. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांच्या सद्गुरूंची शिकवण प्रतीत होत होती. त्यांच्याकडे सद्गुरूंनी दोन दिवस मुक्काम करायला लावला. बेळगांव मध्ये आम्ही एकूण ४ नामस्मरणे केली. त्यापैकी श्री. प्रकाश पाटील व श्री. हिरेमठ हे सद्गुरु भाऊ महाराजांचे जुने भक्त होते. श्री. प्रकाश पाटील यांच्याकडे सद्गुरु भाऊमहाराजांच्या फोटोवर ठेवलेले एक मोठे जास्वंदीचे फूल नामस्मरण संपल्यानंतर आरतीच्या वेळी हळूहळू खाली सरकत बरोब्बर त्यांच्या डोळ्यांच्या आकारावर येऊन स्थिर झाले. ते सद्गुरु भाऊंचे रूप बघण्यासारखे होते. त्या नजरेतून जणू त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या भक्तांना आपले कृपाशीर्वाद प्रदान केले.
बेळगांवमध्येच श्री. हिरेमठ यांच्याकडे जाईपर्यंत ते सद्गुरु भाऊंचे भक्त आहेत व त्यांना सद्गुरु भाऊमहाराजांचे अनुभव आलेले आहेत हे आम्हाला माहित नव्हते. त्यांच्याकडचे नामस्मरण झाल्यानंतर त्या अंकलनी आम्हाला त्यांचा एक ज्वलंत अनुभव सांगितला. ते म्हणाले "जाते जाते सद्गुरु भाऊ हमे सब कुछ देख कर गए". त्याचे झाले असे - श्री. हिरेमठ ज्या घरामध्ये राहत होते त्या घरमालकाने त्यांना ठराविक मुदतीमध्ये ते घर सोडण्यास सांगितले. ती मुदत मार्च २००४ या महिन्यांमध्ये संपत होती. ते सर्व कुटुंब रस्त्यावर यायच्याच मार्गावर होते. अनेक वेळा विनंती करूनही तो घरमालक ऐकत नव्हता आणि ८ मार्च २००४ या दिवशी श्री. हिरेमठ यांना घरमालकाने त्यांची मुदत तीन वर्षांनी वाढवली असल्याचे पत्र मिळाले. ते अतिशय आनंदी झाले. ही सर्व सद्गुरूंची कृपा होती याची त्यांना जाणीव होती. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांना ८ मार्च या दिवशी सद्गुरु भाऊमहाराजांनी आपला देहं ठेवल्याचे कळले आणि त्यांना हे जाणवले की "जाते जाते सद्गुरु भाऊ हमे सब कुछ देकर गए".
|