|
पण ही गुरुकृपा त्यांच्यावर सहज झाली नव्हती. सद्गुरु भाऊमहाराजांच्या सांगण्यानुसार ते गेली अनेक वर्षे 'नमो गुरवे वासुदेवाय' या नामजपाची डायरी नियमितपणे लिहीत आहेत. त्याचप्रमाणे, सद्गुरु भाऊमहाराजांनी केलेल्या लिखित नामजप संकल्पातही त्यांनी अनेक डाय-या लिहून आपले योगदान दिले होते. सद्गुरूंची केलेली कुठली सेवा कधी फुकट जात नाही. सद्गुरु कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये उभे राहून प्रत्येक अडीअडचणीला आपल्याला तारतातच.
बेळगांव मधील चौथे नामस्मरण श्री. साखळकर यांच्या काकांकडे संपन्न झाले. आमच्यापैकी काही भक्त या काकांकडे व काही श्री. हिरेमठांकडे, अशा प्रकारे आमचे वास्तव्य होते. या दोन्ही कुटुंबांनी आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य करून आमचे अगत्याने आदरातिथ्य केले. त्याच दिवशी आम्ही श्रीबाळेकुंद्री महाराजांच्या मठात जाऊन त्यांचेही दर्शन व आशीर्वाद घेऊन आलो.
दुसऱ्या दिवशी आम्हाला हुबळीसाठी प्रयाण करायचे होते. याविषयीचा किस्सा हीसुद्धा सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या त्यांच्या या कार्यातील सगुण अस्तित्वाची प्रचिती आहे. एका महिन्यापूर्वी आम्ही एका नामस्मण्यासाठी वाशी येथे गेलो होतो. हे नामस्मरण संकल्पातील ४१वे नामस्मरण होते. श्री.वैद्य यांच्या पत्नी सुद्धा सद्गुरु भाऊ महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत. सद्गुरूंनी २००४ साली देह ठेवल्यानंतर, सौ. वैद्य यांना स्थानावर गेल्यानंतर भाऊंच्या आठवणीने अत्यंत वाईट वाटे. म्हणून गेली एक-दीड वर्षे त्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी स्थानावर गेल्या नाहीत. आम्ही या संकल्पातील नामस्मरणासाठी त्यांच्या घरी जाण्याच्या आदल्या दिवशी सद्गुरु भाऊमहाराजांनी सौ. वैद्य यांना स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले की "तू जरी मला भेटायला आली नाहीस तरी मी तुला भेटण्यासाठी उद्या तुझ्या घरी येत आहे".
वैद्य कुटुंबातील या नामस्मरणाला सौ. महारुद्राय हिरेमठ नांवाचे सद्गुरू भाऊंचे भक्त आपल्या पत्नीसहित आले होते. वर उल्लेख केलेले बेळगावचे श्री. हिरेमठ यांचे सासरे. वाशीमध्ये जाण्यापूर्वी आमच्या मनामध्ये हुबळी येथे श्री सिद्धारूढ स्वामींच्या मठात सद्गुरूंचे नामस्मरण करावे, असा विचार चालू होता. श्री. महारुद्राय हिरेमठ हे मूळचे हुबळीचे असल्यामुळे आम्ही त्यांना याविषयी बोलून दाखवले. तेव्हा ते पटकन म्हणाले "आप वहाॅं नही जा रहे हो, गुरुवर्य भाऊ महाराज आपको लेकर जाने वाले है|" ते सुद्धा सद्गुरु भाऊ महाराजांचे निस्सीम भक्त असल्यामुळे हे बोलतानादेखील त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते पुढे म्हणाले "आखीर की दिनों मे जब गुरुवर्य भाऊमहाराज बहोत ही बीमार थे, तब मैं उनसे मिलने गया था और तब उन्होंने मेरे पास हुबली जाकर श्री सिद्धारूढ स्वामी के दर्शन करने की उनकी इच्छा व्यक्त की थी |इसी लिये वो ही आपको हुबली लेकर जा रहें हैं| जब आप हुबली आओगे तब हुबली में मेरे घर मे भी गुरुवर्य का नामस्मरण जरूर करना है|"
या सर्व अध्यात्मिक पार्श्वभूमीवर आम्ही बेळगांवहून हुबळी येथे श्री. हिरेमठ यांच्या घरी नामस्मरणासाठी आलो. पहा! सद्गुरु भाऊ आम्हाला कुठे कुठे घेऊन गेले! मुंबई कुठे आणि कर्नाटक प्रांतातील हुबळी कुठे! आम्हाला स्वप्नातही आम्ही या नामस्मरणासाठी कर्नाटक पर्यंत जाऊ असे वाटले नव्हते. हुबळी येथे हिरेमठ कुटुंबाने आमचे एवढे प्रेमाने आदरातिथ्य केले की आम्हाला स्वतःच्याच घरी आल्यासारखे वाटले. त्यांच्या घरी अजूनही एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे नामस्मरणासाठी खूपच माणसे होती. तेथील आजोबांनीही आम्हाला जुन्या त्यांच्या काळातील अनेक गोष्टी सांगितल्या. एकंदरीतच ते ३-४ तास कधी संपले आम्हाला कळलेही नाही.
त्यांच्या घरी वाशीतील श्री. हिरेमठांच्या मेहुणी आल्या होत्या. त्या पुन्हा पुन्हा आम्हाला तेथून जवळच असलेल्या त्यांच्या घरी सद्गुरूंच्या पादुका घेऊन येण्याची व त्यांच्या घरी ही नामस्मरण करण्याची विनंती करीत होत्या. पण आधीच खूप उशीर झाल्यामुळे त्यांच्या घरी नामस्मरण करणे तर दूरंच; जाणेही आम्हाला शक्य वाटत नव्हते. आम्ही त्यांना दोनदा शक्य नसल्याचे सांगितले. पण एवढ्या लांबपर्यंत आलेल्या सद्गुरूंच्या पादुकांचा स्पर्श तरी आपल्या घराला व्हावा ही त्यांची अत्यंत कळकळ पाहून आम्ही त्यांना "५ मिनिटांसाठी येऊ" असे सांगितले.
|