|
त्यांचे नाव श्री महादेवय्या पंचांगमठ. आम्ही सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या पादुका व फोटो घेऊन हुबळी येथील त्यांच्या घरी गेलो. पाहतो तर काय! त्यांनी पारंपारिक पद्धतीने सद्गुरूंना ओवाळून सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी सद्गुरु भाऊंसाठी सुशोभित आसनही तयार करून ठेवले होते. त्या म्हणाल्या "तुम्ही हुबळीला येणार हे कळल्यापासून आम्ही सद्गुरु भाऊमहाराजांच्या दर्शनाची वाट पाहत आहोत". असे म्हणून त्या रडू लागल्या. आम्ही सर्वजण त्यांच्या भोवती गोळा झालो.
त्या म्हणाल्या "मी काही वर्षांपूर्वी खोपोली येथे सद्गुरु भाऊमहाराजांच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा तेथून निघताना सद्गुरु भाऊमहाराज मला म्हणाले होते की - 'मी तुझ्या घरी हुबळीला नक्की येणार'. त्यानंतर अचानक त्यांनी देहं ठेवल्याचे कळले आणि माझ्या मनात विचार आला की माझ्या गुरूंनी मला दिलेल्या शब्द पाळला नाही. म्हणुनच जेव्हा तुम्ही सद्गुरु भाऊ महाराजांच्या पादुका घेऊन येणार असे कळले तेव्हा माझे खात्री होती की आपला शब्द खरा करण्यासाठी सद्गुरु भाऊ माझ्या घरी नक्की येणार. म्हणून मी आधीपासूनच ही सर्व तयारी करून ठेवली होती". त्यांचे हे भावविभोर उद्गार ऐकून आता 'आमच्या' डोळ्यांमध्ये पाणी तरळले. आम्ही वेळेअभावी त्यांना कितीही नाही म्हटले असते तरी सद्गुरु भाऊमहाराज आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाणारच होते. त्यांची भक्तीच तशी होती. सद्गुरूंना भक्ताचा पैसा नको असतो. त्यांना हवा असतो तो भक्ताच्या हृदयातील शुद्ध सात्विक भाव.
त्यांचा भाव एवढा शुद्ध होता की त्यांनी सद्गुरु भाऊ महाराजांना साक्षात दत्त स्वरूपात भजण्यास सुरुवात केली. त्यांनी सद्गुरु भाऊंना उद्देशून श्री दत्तप्रभूंची त्यांच्या भाषेतील स्तोत्रे, आरत्या म्हटल्या. ५ मिनिटांसाठी म्हणून गेलेलो आम्ही तेथे अर्धा तास बसलो. नव्हे, सद्गुरूंनी त्या भाविक दांपत्याच्या घरातून आम्हाला लवकर निघू दिले नाही. अर्ध्या तासाने निघणार; इतक्यात मे महिन्यातील ४ तारखेला सद्गुरुंनी त्या १५ मिनिटांसाठी धुव्वाधार पाऊस पाडला. आम्ही आणखी पंधरा मिनिटे थांबलो. त्या 'भाऊमय' दांपत्याचे पूर्ण आत्मिक समाधान केल्याशिवाय सद्गुरु तेथून कसे निघणार!
भाव तिथे देव - श्री सिद्धारूढ स्वामींचे दर्शन
श्री पंचांगमठ यांच्याकडून निघून आम्ही सरळ श्रीसिद्धारूढ स्वामींच्या आश्रमात आलो. या ठिकाणी आमचे संकल्पातील ५६वे नामस्मरण संपन्न झाले. नामस्मरण झाल्यानंतर निघण्यापूर्वी नमस्कार करण्यासाठी म्हणून आम्ही, म्हणजे मी, माझे पती श्री. विकास व श्री. प्रदीप हजारे पुन्हा गाभाऱ्यात गेलो. तेथील पुजारी श्रीसिद्धारूढ स्वामींची वस्त्रे बदलीत होते. त्यावेळी तेथे बरेच लोक येत होते व दर्शन घेऊन जात होते. पण का कोणास ठाऊक, आमचे पाय तिथून हलेना. त्या दोन पुजाऱ्यांनीही आम्हाला जाण्यास सांगितले नाही. आम्ही श्रीस्वामींच्या समोर उभे होतो. एकेक वस्त्र ते पुजारी उतरवत होते. जवळजवळ एकावर एक अशी ७ ते ८ वस्त्रे त्यांच्या अंगावर घातलेली असावीत. जेव्हा शेवटचे वस्त्र काढल्यावर त्यांचे पूर्ण स्वरूपदर्शन आम्हाला झाले; तेव्हा त्यांचे डोळे भरून दर्शन घेऊन आम्ही त्यांच्या चरणांनाही स्पर्श केला.
त्याचवेळी त्या ठिकाणी एक हातात काठी घेतलेली व्यक्ती आली. आम्ही वळून तिच्याकडे पाहिले; तर पहातच राहिलो. कारण आमच्यासमोर विराजमान असलेले श्रीसिद्धारूढ स्वामी आणि ती व्यक्ती यांमध्ये यत्किंचितही फरक नव्हता. तीच अंगकाठी, तोच चेहरा आणि तेच चेहऱ्यावरचे भाव. आम्ही तिघांनी एकमेकांकडे सहेतूक पाहिले. आम्हाला तिघांनाही त्या क्षणी जाणीव झाली होती की हे साक्षात श्रीसिद्धारूढ स्वामी आहेत. परंतु त्यांना नमस्कार करण्याचे भान आम्हाला राहिले नव्हते. मागे असलेल्या लहानशा दरवाजातून ते दिसेनासे झाले आणि आम्ही भानावर आलो. मी धावत त्यांच्या मागे गेले परंतु ते निघून गेले होते.
|