|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

या साक्षात्कारानंतर आम्ही पुन्हा बेळगांवमध्ये आलो. रात्र खूप झाल्यामुळे आम्हाला पुन्हा श्री. अर्जुनवाडकर यांच्याकडे एक दिवस वास्तव्य करावे लागले. यात्रेमध्ये आम्ही १४/१५ जण होतो. या सर्वांचे चहापाणी नाश्ता हे सर्वच त्यांच्या पत्नींनी अतिशय प्रेमाने व हसतमुखाने केले. त्यांना आमच्यासाठी झालेल्या एवढ्या त्रासाबद्दल आम्हाला फार वाईट वाटत होते. पण ते दांपत्य म्हणाले "अहो हा तर आमच्या सद्गुरू कलावती आईंचा सद्गुरु भाऊमहाराजांच्या रूपात आम्हाला प्राप्त झालेल्या प्रसाद आहे. आमचे भाग्य आहे की सद्गुरु भाऊमहाराज पुन्हा आमच्या घरी वास्तव्यास आले." काय ही गुरूभक्ती! काय गुरूंवरील प्रेम! श्री कलावती आईचे गुरु असलेल्या श्रीसिद्धारूढ स्वामींच्या झालेल्या प्रत्यक्ष दर्शनामुळे अर्जुनवाडकर कुटुंबाने केलेल्या सेवेला आज वेगळेच परिमाण प्राप्त झाल्यासारखे आम्हाला वाटत होते.

श्री अर्जुनवाडकर यांनी बेळगांव येथील श्री कलावती आईचा आश्रम आम्हाला संपूर्ण फिरून दाखवला. त्या ठिकाणी असलेली शांतता व प्रत्येक लहान सहान गोष्टीतील पराकोटीची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. एखादी विभूती जेव्हा सगुण रूपामध्ये कार्यरत असते तेव्हा तिला प्रसन्न करण्यासाठी किंवा तिच्या आदरयुक्त भीतीमुळे भक्तजन अशी शिस्त आवर्जून पाळतात. परंतु ती विभूती देहातीत रूपात गेल्यानंतर तिने लावलेली ही शिस्त किंवा घालून दिलेल्या पायंडा हा भक्तांकडून पाळला जातोच असे नाही. परंतु या श्रीकलावती आईंच्या आश्रमात आजही त्या शिस्तीची व त्या तत्त्वांची जपणूक होत आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी आम्हाला पाहून भरून आले. सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या 'आनंदयोग धाम' या सध्या लहान स्वरूपात असलेल्या पादुका स्थानावर व भविष्यात सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे होणाऱ्या मोठ्या स्थानावर आम्हा भक्तांकडून अशाच शिस्तीची व गुरुतत्त्वाची जपणूक व्हावी हे मागणे मागून व श्रीकलावती आईंचे आशीर्वाद घेऊन आम्ही गोव्याच्या मार्गावर असलेल्या दाणोली या सद्गुरू साटम महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आलो. मागच्या यात्रेतील दाणोलीतील वास्तव्याच्या आठवणींना उजाळा देऊन आम्ही गोव्याला निघण्यापूर्वी सद्गुरु अण्णामहाराजांना आमची विशेषतः आमच्या मुलीची खुशाली कळवण्यासाठी फोन केला. तर सद्गुरु अण्णा म्हणाले "तुम्ही आताच इथे या. मी जेवणासाठी वाट बघतो".

असेही गोव्याहून येताना आम्ही सद्गुरु श्रीराऊळमहाराजांच्या दर्शनाला जाणारच होतो. पण गेल्या यात्रेप्रमाणे याही वेळी सद्गुरूंच्या मनात आम्हाला गोव्याला नेण्याचे नसावे. त्यांच्या इच्छेने इथपर्यंत आलो होतो त्यांच्याच इच्छेने आम्ही दाणोलीवरून सरळ पिंगुळी येथे जाण्यास निघालो. श्रीक्षेत्र नरसोबा वाडी सोडल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर म्हणजे इचलकरंजी, कोल्हापूर, बेळगांव या सर्व ठिकाणी असताना सद्गुरु अण्णा फोनवरून आमच्या सतत संपर्कामध्ये होते. फक्त चि. पूजाच्या चौकशीसाठी. आम्ही इचलकरंजीला असताना नामस्मरण सुरू असताना आमच्या फोनचा रिंगर बंद ठेवला होता. त्या वेळामध्ये सद्गुरु अण्णांचे एकूण २२ फोन आले होते जे मिस्ड कॉल मध्ये केले होते. नामस्मरण संपल्यानंतर बऱ्याच वेळाने मोबाईल बघितल्यानंतर जेव्हा आमच्या हे लक्षात आले; तेव्हा आम्हाला फार वाईट वाटले.

सद्गुरु विनायक अण्णा राऊळमहाराजांसारखी एक अवलिया विभूती आमच्या मुलीच्या तब्येतीच्या चौकशीसाठी स्वतःला एवढे कष्ट करून घेत होती. त्यानंतर आम्ही त्यांना फोन केला तेव्हा दुपारचे अडीच-तीन वाजून गेले होते मी त्यांच्या मुलाला म्हटले की "सद्गुरु अण्णा जर का झोपले असतील तर त्यांना उठवू नका. त्यांना फक्त सांगा की पूजा आता एकदम बरी आहे". यावर त्यांचा मुलगा म्हणाला -"अण्णा तुमच्या मुलीची खूप काळजी करत होते. रात्री दोन वाजेपर्यंत जागे होते आणि आताही विश्रांतीसाठी जाण्यापूर्वी त्यांनी मला निक्षून सांगितले आहे की जेव्हा खामकरांचा फोन येईल तेव्हा मला उठव". हे ऐकून आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. भक्तवत्सल भक्ताभिमानी अशा सद्गुरु अण्णांचे आमच्यावरील प्रेम पाहून असे वाटले की "आणखी काय हवे जीवनामध्ये?"

दाणोली येथून आम्ही श्रीक्षेत्र पिंगुळी येथे गेलो तेव्हा सद्गुरु अण्णा आमची वाटच पाहत होते. त्यांनी चि. पूजाला जवळ घेतले व मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यानंतर सद्गुरु अण्णा सहज बोलल्यागत म्हणाले की-"त्यावेळी पूजासाठी मोठा खड्डा खणला गेला होता. राऊळबाबांसमोर शेवटी मी डोके आपटून तो खड्डा बुजवण्याची प्रार्थना केली आणि रात्री २ वाजता औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या. तिची काळजी वाटत होती म्हणून एवढे फोन केले." असे म्हणून सद्गुरु अण्णांनी आम्हाला आईच्या मायेने जवळ घेतले. आमची श्री अण्णामहाराजांशी भेट झाल्यापासूनच, गेल्या इन मिन ७-८ महिन्यांमध्ये सद्गुरु अण्णांनी आम्हाला एवढे प्रेम दिले आहे की त्याची परतफेड आम्ही अनेक जन्मांत करू शकणार नाही. "सद्भक्तांनी नेहमी सद्गुरूंच्या ऋणांमध्ये राहावे" असे जे सद्गुरु भाऊमहाराज मला एकदा म्हणाले होते तेच खरे.

पिंगुळीहून पुन्हा मुंबईला येताना आम्ही कोकणातील आणखी एक अवलिया सत्पुरुष सद्गुरु श्री भालचंद्र महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये गुरुवर्य भाऊमहाराजांचे संकल्पातील ५७वे नामस्मरण केले. तेथील व्यवस्थापक व सेवेकरी या सर्वांनी आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केले. योगीयांचा योगी असलेले श्री भालचंद्र महाराज हे सद्गुरु समर्थ श्री साटम बाबांचे शिष्य. कित्येकांनी 'वेडा' म्हणून संबोधलेल्या अवलिया श्री भालचंद्र महाराजांनी आजन्म अपार कष्ट उपस्थित व समाजकार्य करून कित्येकांच्या जीवनात त्यांनी आनंद निर्माण केला. मुंबई येथे अखंड नामसंकीर्तन दंग असतानाच ते पंचत्वात विलीन झाले. अशा पुण्य पावन स्थानावरती सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे नाम संकीर्तन करून आम्ही पावन झालो.

आम्ही मनात संकल्प केलेल्या सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या परमपावन अस्थीविसर्जनाच्या तीर्थक्षेत्रांपैकी फक्त नरसोबाची वाडी हे एकच पूर्ण झाले होते. त्यामुळे आम्ही पुढची यात्रा श्री क्षेत्र हरीहरेश्वर पासून सुरू केली. कोकणातील पांगरे बुद्रुक येथील श्रीहरीहरेश्वराचे दर्शन तर झालेच होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील या श्रीहरीहरेश्वर मंदिरामध्ये आम्ही सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज या साक्षात् शिवस्वरूप सद्गुरूंचे नामस्मरण केले. हे नामस्मरण झाल्यावर आम्ही 'ओम नमः शिवाय' या श्रीशंकराच्या नामजपाचेही १० मिनिटे संगीतमय नामस्मरण केले. हे नामस्मरण एवढे रंगले की आजही आठवण झाली की अंगावर रोमांच उभे राहतात.

श्रीक्षेत्र हरिहरेश्वर होऊन आम्ही श्रीक्षेत्र पाली येथे आलो. श्रीक्षेत्र पाली हे श्रीअष्टविनायकापैकी एक स्वयंभू जागृत देवस्थान. या ठिकाणी श्रीबल्लाळेश्वर गणेशमूर्तीच्या समोर सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या नामस्मरणाला मंदिरातील सर्व गणेश मूर्तींच्या समोर सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या नामस्मणाला मंदिरात सर्व हॉल भरला होता. आम्ही सोडलो तर सर्वच नवीन माणसे होती त्यामुळे एवढ्या अनोळखी माणसांपर्यंत सद्गुरूंचे नाम पोहोचण्याचा आनंद आम्हाला झाला. या पुढच्या क्षणांची आम्ही सारेच आतुरतेने वाट पाहत होतो.

<< Previous      Next >>