|
सद्गुरु आनंदयोगेश्वर या सिद्धतेजाचे जन्मस्थान श्रीक्षेत्र नाडसूर
यात्रेमधील आम्हा सर्वांनाच पुढच्या टप्प्यातील नामस्मरणाची उत्सुकता लागून राहिली होती. त्याचे कारणही तसेच होते. यापुढचे नामस्मरण संपन्न होणार होते सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या जन्म गावी म्हणजेच श्री क्षेत्र नाडसूर या ठिकाणी. आणि आम्ही सर्वजण प्रथमच तिथे चाललो होतो. आपल्या साक्षात दत्तावतारी सद्गुरूंच्या जन्मंगावी आपण पाऊल ठेवणार आहोत याचे सर्वांनाच मोठे अप्रूप वाटत होते. नाडसूरमध्ये गेल्या गेल्या प्रथमतः आम्ही सद्गुरु भाऊ महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच जिथे त्यांचे घर होते ती जागा शोधून काढली. त्याठिकाणी आता काहीच बांधकाम नसून लहान लहान झुडपांची नुसती पडीक जमीन आहे हे पाहून आम्हाला फार वाईट वाटले.
संध्याकाळ होऊन गेली होती. हळूहळू काळोख पडू लागला होता. तरी त्या संधीप्रकाशात आम्ही सर्वांनी आमच्याबरोबर गाडीमध्ये नेलेली सद्गुरु आनंदयोगेश्वरांची खुर्ची (या खुर्चीचे महत्त्व या पुस्तकाच्या भाग १ मध्ये विशद केलेले आहे) त्या ओसाड माळरानावर ठेवली. त्या खुर्चीवर सद्गुरु आनंदयोगेश्वरांना विराजमान करून आम्ही सर्वजण खाली जमिनीवर बसलो. खुर्चीच्या बाजूला सद्गुरु भाऊंच्या चेहऱ्यावर पडेल असा इमर्जन्सी लाईट लावला. आम्ही ज्या गावकऱ्यांकडे सद्गुरु भाऊ महाराजांच्या या जागेची चौकशी केली होती ती माणसेही आमच्याबरोबर होती.
अतिशय शांत निरव वातावरणामध्ये आम्ही 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' असे मोठ्याने म्हटले आणि क्षणात सारा आसमंत अनेक ज्योतींनी उजळून गेल्याचे भासमान झाले. त्यानंतर आम्ही सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे गुरुस्तोत्र म्हटले व 'दिगंबरा दिगंबरा वासुदेव गुरुभाऊ दिगंबरा' आणि 'हे वासुदेव श्री गुरुदत्त आनंदयोगेश्वर निळकंठ' या दोन नामजपांचे प्रत्येकी ११ वेळा नामस्मरण केले सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांच्या फोटोतील डोळे पाणावल्याचे आम्ही प्रत्येकाने पाहिले.
ज्या गांवामध्ये आपल्या सद्गुरूंचा जन्म झाला आहे त्या गांवामध्ये त्यांच्या ७५व्या जयंतीप्रित्यर्थच्या संकल्पातील नामस्मरण करण्याचे विशेष औचित्य होते. आम्ही गांवातील लोकांना विचारले. ते म्हणाले की "गावामध्ये श्री काळभैरवनाथाचे जागृत मंदिर आहे. त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण व्यवस्थितपणे करू शकाल." एक गावकरी आमच्याबरोबर गाडीत आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी आला. आम्ही त्या मंदिरात गेलो. मंदिरा बाहेर '७५ नामस्मरण' संकल्पाचा सद्गुरु भाऊमहाराजांचा मोठा फोटो असलेला बॅनर लावला. त्या गावातील लोकांनी आम्हाला अपेक्षेबाहेर अतिशय छान सहकार्य केले. त्यांनी ट्यूबलाइटस् आणल्या. श्री टेंबेस्वामी महाराजांचा फोटो ठेवण्यासाठी टेबलाची व्यवस्था केली. आम्हाला भेटलेल्या त्या ३-४ माणसांनी गांवातील बऱ्याच लोकांना बोलावून आणले. श्री काळभैरवाचे ते मंदिर त्यावेळी पूर्णपणे भरलेले होते. अशाप्रकारे नाडसूर या आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या जन्मगावी या संकल्पातील नामस्मरण अतिशय उत्तमरीत्या संपन्न झाले.
आरतीनंतर श्री. विकास यांनी सद्गुरु भाऊमहाराजांच्या जीवनकार्याची माहिती तेथील उपस्थित जनांना दिली व ज्या मातीमध्ये अशा योगी दत्तावतारी सत्पुरुषाचा जन्म झाला त्या नाडसूरचे महत्त्व काय आहे हे त्यांना समजावून सांगितले. अपूर्व असा सद्गुरूंनी जुळून आणलेला योग म्हणजे ज्या दिवशी सद्गुरु भाऊंचा जन्म झाला तो दिवस सोमवार होता आणि ज्यादिवशी आम्ही त्यांच्या जन्मस्थानी हे नामस्मरण केले तोही दिवस सोमवारच होता त्याचप्रमाणे '७' हा सद्गुरु भाऊ महाराजांचा अतिशय आवडता अंक आणि त्या ठिकाणी संपन्न झालेल्या नामस्मरणाचा क्रमांक होता ६१. सहा आणि एक म्हणजे ७.
त्यानंतर आम्ही सर्व गावकऱ्यांना मिठाई वाटली. त्याचप्रमाणे सद्गुरु आनंदयोगेश्वरांचा फोटो आणि 'नाम चिंतनाने चिंतामुक्त व्हा' या त्यांनी अखिल मानवजातीला दिलेल्या संदेशाची स्टिकर्स तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना तर दिलीच; पण संबंध गावांमध्ये प्रत्येक घरी एक स्टिकर लावायला सांगितले. सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे भक्तांना आलेल्या अनुभवाच्या पुस्तकाच्या काही प्रती ग्रामस्थांना वाचण्यासाठी नाडसूरच्या वाचनालयात ठेवण्यात आल्या.
त्यादिवशी सद्गुरुंच्या कार्याविषयी आम्हाला खरे समाधान वाटले व आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानून आम्ही पुण्याचा दिशेने निघालो . पुण्याला आमचा मुक्काम श्री. वृषल जगताप यांच्याकडे होता. 'गुरुतत्व' काय असते, आध्यात्म म्हणजे काय - याचे काहीही ज्ञान नसलेल्या या जगताप दांपत्याने आमचे खूप प्रेमाचे आदरातिथ्य केले. त्यांच्याच घरी आमचा पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम होता . या दोन दिवसात त्यांच्याकडून त्यांच्याही नकळत खूप गुरुसेवा घडली. त्यांनी ज्या प्रेमाने आमची सर्व व्यवस्था केली होती, ते पाहता हेच सांगावे वाटते की, ' एका माणसाने दुसऱ्या माणसाची प्रेमाने वागणे ' याच्याहून दुसरे अध्यात्म ते काय! आणि त्यासाठी मोठे मोठे ग्रंथ वाचावे लागत नाहीत, जपाचे असंख्य मणी ओढावे लागत नाहीत. फक्त मन शुद्ध असावे लागते.
|