|
श्री. वृषल आणि पिंकी जगताप यांनी शुद्ध भावनेने सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे स्मरण केले. त्यानंतर नामस्मरण अशा विभूतीसामेर होणार होते जी सद्गुरुंच्या या कार्यामध्ये अखंड आमच्याबरोबर असते. ती विभूती म्हणजे शंकर महाराज. श्री स्वामी समर्थ परिवारातील या अवलिया सत्पुरुषाने या पुस्तकाचा पहिला भाग अक्षरशः श्वास घेण्याचीही फुरसत न देता माझ्याकडून १५ दिवसात लिहून घेतला होता. सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या ' आनंदयोग धाम ' येथून सुरु असलेल्या या महत्कार्याला श्रीसद्गुरु शंकर महाराजांचे अनंत कृपाआशीर्वाद लाभले आहेत. पुण्यामधील धनकवडी या ठिकाणी असलेल्या श्रीशंकर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये सद्गुरुंचे संकल्पातील ६३वे नामस्मरण संपन्न झाले. या प्रसंगी या मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी तसेच सेवेकऱ्यांनी आम्हाला उत्तम सहकार्य केलं.
श्रीशंकरमहाराजांची माध्यान्ह आरती करून आम्ही पुण्यातील श्री. अशोक लोंढे यांच्याकडे सद्गुरू भाऊमहाराजांचे पुढचे नामस्मरण केले. या ७५ नामस्मरण संकल्पातील प्रत्येक नामस्मरण हे आम्हाला वाटले म्हणून न होता सद्गुरू भाऊमहाराजांच्या इच्छेने झाले आहे. ज्याचा ज्याचा जेवढा जेवढा वाटा होता, जसे जसे सद्गुरुंशी ऋणानुबंध होते तसा आनंद त्या प्रत्येकाला सद्गुरूंनी या नामस्मरणाच्या माध्यमातून दिला. श्री. लोंढे कुटुंबियांनाही या नामस्मरणातील नाद लहरींचा खूप आनंद मिळाला. त्यांच्याकडे दुपारच्या प्रसादभोजनाचा लाभ घेऊन आम्ही पुण्यामधील धायरी या ठिकाणी असलेल्या श्रीसंत गुळवणी महाराज आश्रमामध्ये गेलो.
या परमपूज्य श्रीगुळवणी महाराज सिद्धयोग आश्रमाची स्थापना त्यांचे परमशिष्य, सद्गुरू डॉ. केशवराव जोशी महाराजांनी केली. या ठिकाणी आनंदयोगेश्वरांचे नामस्मरण करण्याचे आमच्यासाठी विशेष औचित्य होते याचे एक महत्वाचे कारण म्हणजे परमपूज्य गुळवणी महाराज हे श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे परमशिष्य. म्हणजेच आम्ही सर्व एकाच गुरुपंरंपरेतील होतो.
दुसरे म्हणजे, ज्यांनी हा आश्रम स्थापन केला; त्या डॉ. केशवराव जोशी महाराजांनी त्यांचे सद्गुरू परमपूज्य श्रीगुळवणी महाराज यांच्या आज्ञेनुसार, प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे बृहत चरित्र ९ खंडांमध्ये लिहून प्रसिद्ध केले. त्याकरिता त्यांनी पदरमोड करून, शरीर साथ देत नसतानाही, कोणी मदतीचा हात नसतानाही, केवळ मनोनिग्रहाच्या बळावर, ज्या ज्या ठिकाणी टेंबेस्वामी महाराजांनी विशेष वावर केला होता; त्या त्या ठिकाणी भेटी दिल्या. ज्या ज्या ठिकाणी श्रीस्वामी महाराजांनी चातुर्मास केले होते; त्या त्या सर्व ठिकाणी ते स्वतः गेले व त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती संकलित केली. श्रीस्वामी महाराजांनी स्वतः वापरलेले कमंडलू, छाटी, त्यांनी त्यांच्या शिष्यांना पाठवलेली मार्गदर्शनपर पत्रे; त्याचप्रमाणे स्वामी महाराजांनी त्यावेळी स्वतः रचून भक्तांना दिलेली स्तोत्रे हे सर्व परमपूज्य डॉ. जोशीमहाराजांनी अपार कष्ट करून मिळवले व ते या मार्गातील पुढील साधकांना उपलब्ध करून दिले हे, या गुरुपरंपरेला दिलेले त्यांचे योगदान अतिशय मौलिक आहे.
सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज आम्हाला या यात्रांच्या माध्यमातून अशा अनेक स्थानांवर घेऊन गेले; ज्या ठिकाणी एखाद्या शिष्याने किंवा भक्ताने आपल्या स्वकष्टाने आणि अखंड ध्यासातून, तळमळीतून एखादे स्थान अथवा मंदिर निर्माण केले आहे व त्याची योग्यप्रकारे जपणूक त्याठिकाणी चालू आहे. कारण नि:स्वार्थ बुद्धीने ज्या ज्या ठिकाणी त्या परमेश्वरीय शक्तीचे कार्य तिच्या भक्तांकडून चालू असते; त्या ठिकाणी ते परमतत्व चैतन्यरूपाने वास करीत असते. अशा या चैतन्यमयी अशा श्री गुळवणी महाराज सिद्धयोग आश्रमामध्ये आजन्म महाराजांचे अवतारी कार्य केलेल्या सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे ६५वे नामस्मरण संपन्न झाले.
त्यानंतरचे नियोजित नामस्मरण ज्या ठिकाणी व्हायचे होते ते काही कारणास्तव आयत्यावेळी रद्द झाले. शेवटी मघाशी म्हटल्याप्रमाणे हे योग असतात. श्री. गुळवणी महाराजांच्या आश्रमामध्ये श्री केळकर नावाचे श्री. साखळकर यांचे स्नेही नामस्मरणासाठी आले होते. त्यांना हे नामस्मरण इतके आवडले की, त्यांनी त्याच रात्री त्यांच्या घरी हे नामस्मरण करण्याची इच्छा प्रदर्शित केली. आम्ही होकार देताच लगेच त्यांनी आपल्या घरी तसे कळवले. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची नामस्मरणाची व सद्गुरूंच्या स्वागताची तयारी पाहिल्यानंतर आम्हाला एवढ्या आश्चर्य वाटले की एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी हे कसे काय केले असेल! सद्गुरूंनी जुळवून आणलेले हे नामस्मरण त्यांनीच यथासांग पूर्ण करून घेतले त्यांच्याकडे आयत्यावेळी जाऊन सुद्धा त्यांनी १५ जणांच्या रात्रीच्या प्रसाद भोजनाची ही उत्तम व्यवस्था केली होती. सद्गुरूच्या भक्ताला काय कमी?
दुसऱ्या दिवशी सद्गुरू समर्थ विनायक अण्णा राऊळ महाराजांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आम्ही चिंचवड मधील श्री. बाळकृष्ण लोके यांच्या घरी गेलो. आधीच्या यात्रेच्या वेळी जेव्हा आम्ही पिंगुळी येथे गेलो होतो तेव्हा अण्णांनी मला सांगितले होते की जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये नामस्मरणासाठी जाल; तेव्हा चिंचवडला रेखाकडे नामस्मरण करा. त्यांना त्यांची आवड आहे." जेव्हा आमची पुण्याची यात्रा ठरवत होती तेव्हा मी सौ. रेखा ताईंना फोन करून सद्गुरु भाऊमहाराजांच्या या नामस्मरणाविषयी विचारले. त्यांनी आनंदाने "एकदाच काय, दर महिन्याला येऊन केलं तरी आम्हाला आवडेल" असे सांगितले. श्री. बाळकृष्ण व सौ. रेखा लोके हे सद्गुरु श्रीअण्णामहाराजांच्या परम शिष्यांपैकी एक होत. सद्गुरु अण्णांनी आपल्या गुरूंचे, सद्गुरु समर्थ राऊळ महाराजांचे कार्य करून, पिंगुळी हे प्रति पंढरपूर असे तीर्थक्षेत्र बनवले आहे, त्याला या लोके दांपत्याची सर्वार्थाने समर्थ साथ लाभली आहे.
श्री.लोके यांच्याकडे नामस्मरण करणे हा आमच्यासाठी दुग्धशर्करा योग होता. कारण आम्हाला आमच्या दोन्ही सद्गुरूंचे नामस्मरण एकाच वेळी करण्याचा आनंद मिळाला. सद्गुरू आनंदयोगेश्वरांचे आणि सद्गुरू राऊळमहाराजांचे अशी दोन्ही नामस्मरणे एकात एक गुंफून कशी म्हणायची याची काहीही पूर्वतयारी नसतानाही, ही दोन्ही नामस्मरणे अगदी दणक्यात पार पडली . श्री. व सौ . लोके यांनीही आमचे प्रेमाने आदरातिथ्य केले. यावेळीही एक छान योगायोग जुळून आला. तो म्हणजे सदगुरू अण्णा महाराजांची जन्म तारीख १३ आहे आणि श्री. लोके यांच्याकडे झालेल्या संकल्पातील नामस्मरण क्रमांक होता ६७. म्हणजे सहा आणि सात तेरा .
|