|
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासि कळस
चिंचवड येथून आम्ही सरळ खोपोली येथे सद्गुरू भाऊमहाराजांनी स्थापन केलेल्या श्रीटेंबेस्वामी महाराजांच्या स्थानावर जाणार होतो . पण श्री. लोके यांच्याशी झालेल्या बोलण्यातून चिंचवडपासून श्रीक्षेत्र आळंदी फक्त १२ कि. मी. वर आहे असे समजताच; आम्ही श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी आळंदीला जाण्याचे ठरवले . या नामस्मरण यात्रा काढून अनेक स्थानांवर किंवा मंदिरांमध्ये नामस्मरण करण्याचा किंवा सद्गुरुंच्या पादुका घेऊन त्या ठिकाणी दर्शनाला जाण्याचा आमचा हेतू एवढाच होता की, तेजाला तेज मिळून त्यापासून निर्माण होणा-या स्पंदनांचा शाश्वत आनंद, जो जो त्या इच्छेने येईल त्या प्रत्येकाला मिळावा.
आळंदी येथे श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेताना आम्ही हाच आनंद अनुभवला . तेथील पुजा-यांनी, आम्ही न सांगताच, सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचा फोटो व पादुका आमच्याकडून मागून घेतल्या व श्रीज्ञानराजाच्या संजीवनी समाधीवर ठेवल्या . माझ्या मनात गेले अनेक दिवस 'आनंदयोग-धाम' या सदगुरुंच्या पादुका-स्थानावर वीणा घेऊन नामस्मरण करावे हा विचार येत होता . परंतु या यात्रांच्या तयारीमध्ये मी तो विचार विसरून गेले होते . आळंदी येथे दोन/तीन दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या वीणा बघितल्या आणि दर्शन घेऊन बाहेर येताना मी आळंदी येथेच वीणा विकत घेण्याविषयी श्री. विकास यांच्याशी बोलले . त्यांनाही ही कल्पना आवडली . आम्ही एक वीणा विकत घेतली व तेथून निघणार तोच श्री. विकास म्हणाले की “आळंदीला वीणा घेण्याचा योग आला आहे, तर श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला स्पर्श करून मग आपल्याकडे नेऊ या".
आमच्या बरोबरची भक्तमंडळी लांबवर पार्क केलेल्या गाडीत जाऊन बसली. आम्ही पुन्हा आत गेलो, तर मुख्य मंदिर २ तासांसाठी बंद झाले होते. आम्ही विचारपूस केल्यानंतर एकाने सांगितले की “दोन महिन्यांतून एकदा समाधीला चंदन उटी लावण्याचा विधी असतो. तो आजचा दिवस असल्यामुळे आता एवढ्यात तुम्हाला आत जाता येणार नाही .” अजुन दोन तास थांबणे आम्हाला शक्य नव्हते; कारण आधीच दुपारचा १ वाजून गेला होता. सर्वांना भूकही लागली होती आणि सर्वांत मुख्य म्हणजे गाडीत जाऊन बसलेल्या भक्तमंडळींना आम्हाला किती वेळ लागतो आहे हे कळणे शक्य नव्हते . आता काय करावे?
आम्ही जाज्वल्य इच्छाशक्तीने दरवाजासमोर उभे होतो . मनामध्ये सद्गुरूंची आळवणी करीत होतो की “तुम्हीच इथपर्यंत आणले आहे तर पुढेही तुम्हीच घेऊन चला." अर्धा पाऊण तास बाहेर उभे राहिल्यानंतर तिथून आत बाहेर करणा-या एका पुजा-याला काय वाटले कुणास ठाऊक ! त्याने आम्हाला मागच्या दरवाजाजवळ येण्यास सांगितले व त्यानंतर १० मिनिटांनी त्यांनी आम्हाला मागच्या दरवाजाने आत घेतले. श्रीसमाधीला उटी लावल्यानंतर दर्शन घेणारे आम्हीच पहिले होतो. माझ्या हातातील वीणा मी अनन्यभावाने तेथे ठेवली व त्या क्षणाचा तो आनंद दिल्याबद्दल श्रीज्ञानेश्वर माऊलीला मनःपूर्वक धन्यवाद दिले . त्याठिकाणी श्रीज्ञानेश्वर माऊलीचा सोन्याचा मुखवटादेखील होता जो आम्ही पहिल्यांदा घेतलेल्या दर्शनाच्या वेळी नव्हता . डोळे मिटून नमस्कार करून झाल्यावर मी तेथे ठेवलेली वीणा उचलायला गेले . मनात विचार आला, त्या मुखवटयावरील हार आपल्याला प्रसाद म्हणून मिळाला तर! जेव्हा मी वीणा उचलून हातात घेतली; तेव्हा त्या वीणेच्या तारांवरोवर आपोआपच गुंतून भरपूर मंजि-या व पाने असलेली तुळस
आली. माझ्या तन मनातून एक वेगळीच लहर गेली आणि माझ्याही नकळत मी गुणगुणायला लागले -
“कंठात तुळशीची माळ, कस्तुरी टिळा
देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा'.
|