|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

७ सप्टेंबर २००६ या दिवशी साज-या होणा-या, सदगुरू आनंदयोगेशवर निळकंठ महाराजांच्या ७५व्या जयंतीप्रित्यर्थ आम्ही तारखेला सकाळी, एका प्रहराचे, हीच वीणा घेऊन सामुदायिक नामस्मरण करण्याचे ठरवले; जेणेकरून श्रीज्ञानेश्‍वरमाऊलीचा हा शाश्‍वत प्रसाद सर्वांना मिळेल.

“ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासि कळस” असे आपल्या वारकरी संप्रदायात म्हटले जाते . या 'पाया' चे दर्शन घेऊन झाले . आता सद्गुरू आम्हाला कळसाकडे घेऊन चालले होते . कुठल्याही कार्याला काय किंवा वास्तूला काय, कळस चढण्यासाठी त्याचा पाया आधी भक्कम व्हावा लागतो . संत तुकारामांनी श्रीज्ञानेश्वरमाऊली प्रमाणेच आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे क्लेश, दारिद्रय, अवहेलना हसतमुखाने सहन करता करताच, आपल्या विठू माऊलीची अनन्यसाधारण भक्ती केली आणि भक्तीमार्गातील आपल्या जीवनातील पाया अनेक संकटरूपी वादळांना तोंड देत भक्कम केला .

“ठेविले अनंते तैसेचि रहावे | चित्ती असू द्यावे समाधान ||' हा संदेश स्वत:च्या कृतीने जनसामान्यांपर्यंत पोचवणारे जगदगुरू तुकाराम महाराज म्हणूनच तर संतश्रेष्ठ व सर्वानाच वंदनीय ठरतात . तुकारामाची गाथा इंद्रायणीमध्ये तरंगली असे म्हणणे सोपे आहे . पण कोणाचीही कागदपत्रे अशी पाण्यामध्ये तरंगून टिकतील काय? त्यासाठी त्यागयुक्त भक्तीची परिसीमा गाठता आली पाहिजे. ही परिसीमा श्रीतुकाराम महाराजांना केवळ अखंड 'नाम' घेतल्यानेच साध्य झाली. म्हणुनच त्यांच्या सदेह वैकुंठवासाच्या फाल्गुन कृष्ण द्वितीया या तीथिला 'तुकाराम बीज' असे संबोधले जाते.

ज्या सदगुरू आनंदयोगेश्वरांनी केवळ अखंड 'नामा' च्याच माध्यमातून आपल्या भक्तांना विविध तापांतून योग्य मार्ग दाखवीत तारले; त्यांनीही याच तीथिला देहं ठेवावा हा एक देवदुर्लभ योगच म्हणता येईल . सद्गुरू आनंदयोगेशवरांनी २००४ सालातील “तुकाराम वीज' या तीथिलाच आपले सगुण रूपातील अवतार कार्य संपवले. त्यामुळे देहू येथे श्रीतुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाताना आमचे हृदय उचंबळून आले होते. बाजुला वहात असलेली इंद्रायणी पाहून 'केव्हा एकदा त्या तुकामाऊलीचे दर्शन घेतो असे आम्हाला झाले होते.

आम्ही सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या पादुका घेऊन आत मंदिरात गेलो; तेव्हा आमच्या हातात आळंदीहून आणलेली वीणासुध्दा होती . आत जाऊन पहातो; तर सदगुरू तुकाराममहाराजांची मूर्तिदिखील तशीच होती. हातात वीणा घेऊन उभी असलेली. आम्ही त्यांच्यासमोर पादुका व फोटो ठेवला. त्या मंदिराच्या भिंतींना टेकून आम्ही चारी बाजुंनी उभे राहिलो आणि श्री. विकास यांनी वीणेचा दोरा आपल्या गळयामध्ये अडकवून वीणेच्या झंकारामध्ये सद्गुरू आनंदयोगेश्वरांचे नामस्मरण करण्यास सुरूवात केली. ते मंतरलेले क्षण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आम्हाला कोणीही अडवले नाही, तर उलट येणारी माणसे आमच्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करायची.

श्री . विकास यांनी “दिगंबरा दिगंबरा वासुदेव गुरूभाऊ दिगंबरा” या अक्षय नामजपाचे नामस्मरण करून माझ्या हातात वीणा देऊन पुढचे नामस्मरण करण्याची खूण केली. मी हातात ती सरस्वतीस्वरूप वीणा घेतली आणि आपोआपच माझ्याकडून “हे वासुदेव श्री गुरूदत्त आनंदयोगेश्‍वर निळकंठ”. हे अक्षरब्रह्म “खेळ मांडियेला वाळवंटी घायी, नाचति वैष्णव भायी रे ” या चालीवर म्हटले गेले. कुठल्याही वाद्यांची साथ नसताना ही दोन्ही नामस्मरणे सर्वाच्याच अंतर्मनामध्ये रंगली. तेथून निघून खोपोली येथे श्रीटेंबेस्वामी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही श्रीचैतन्यगगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी गेलो.

सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या ७५व्या जयंतीवर्षा प्रित्यर्थ हा “७५ नामस्मरण संकल्प केल्यानंतरही आम्ही सदगुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी खोपोली येथे गेलो होतो. त्यावेळी आम्ही श्रीचैतन्यगगनगिरी महाराजांनाही हा संकल्प निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी त्यांच्या दर्शनाला गेलो होतो. त्यामुळेच आज ७५ पैकी ६७ नामस्मरणे झाल्याचे श्रीचैतन्यगगनगिरी महाराजांच्या कानावर घालून आम्हाला या कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते. त्यांच्या आश्रमात आम्ही सदगुरू भाऊमहाराजांच्या पादुका व फोटो घेऊनच गेलो होतो. श्रीगगनगिरी महाराजांसमोर तो फोटो घेऊन जाताच त्यांनी अतीव प्रेमाने सदगुरू भाऊंकडे पाहिले व सद्गुरू भाऊमहाराजांच्या चेह-यावरून आपला हात फिरवला.

<< Previous      Next >>