|
सर्व गोष्टी आमच्या अध्यात्मिक इच्छेनुसार घडत होत्या. एवढयात नामस्मरणाची तारीख व वेळ नक्की करण्यासाठी मी पुन्हा शिर्डी येथे तेथील व्यवस्थापकांना फोन केला असता, त्यांनी मला स्पष्टपणे “तुम्ही कितीही वेळ त्या स्टेजवर नामस्मरण करू शकता; पण ते नामस्मरण केवळ बाबांचे असले पाहिजे . या ठिकाणी साईबाबांशिवाय कोणाचेही नामस्मरण करण्यास परवानगी नाही तसेच त्या संपूर्ण परिसरामध्ये श्रीसाईबाबा सोडून कोणत्याही सत्युरूषांचा फोटो आणण्यास सक्त मनाई आहे" असे सांगितले. हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या ७५व्या जयंतीसाठीच तर तो नामस्मरण संकल्प होता आणि शेवटचे नामस्मरण करताना त्यांचे नाम घ्यायचे नाही हे कसे शक्य होते? शिवाय ज्यांचा ७५वा वाढदिवस, त्यांना गाडीत ठेवून आम्ही दर्शनासाठी आत जायचे, हेसुध्दा मनाला पटण्यासारखे नव्हते - पुन्हा आमच्यापुढे धर्मसंकट उभे राहिले कारण तोपर्यंत जवळ जवळ २५ भक्तांनी यात्रेसाठी नांवे दिली होती. आम्ही बससुध्दा आरक्षित केली होती . आता काय करावे? योगायोगाने आम्हाला एका व्यक्तीचा फोन नंबर मिळाला होता. त्यांचे नांव होते श्री. प्रकाश कारखानीस.
जेव्हा शिर्डीवरून वरीलप्रकारे निराशाजनक निरोप मिळाला तेव्हा मी आमची एक गुरूभगिनी रश्मी हिला श्री. कारखानीस यांना फोन करून, यामध्ये ते आपली कुठली मदत करू शकतील का, असे विचारण्यास सांगितले . थोडया वेळाने तिने मला फोन करून कळवले की, “श्री . कारखानीस यांनी मदत करणे तर दूरच; पण
अलट श्रीसाईबाबांसमोर दुस-या कुठल्याही सत्पुरुषांचे नामस्मरण करण्याची आवश्यकताच काय आणि त्यांचा फोटो आतमध्ये नेण्याचा तुमचा अट्टाहास
कशाला, असे म्हणून माझी खरडपट्टी केली .” त्यादिवशी शनिवार होता . श्री - विकासही ऑफीसमधून लवकर घरी आले होते . पण आमच्या दोघांमध्ये काही संभाषण झाले नाही . बुध्दीच काम करत नव्हती . संध्याकाळपर्यंत अशाच विमनस्क अवस्थेमध्ये बसून राहिलो आणि मग निर्णय घेतला की 'जर सदगुरू
भाऊंना गाडीमध्ये ठेवून श्रीबाबांच्या दरवारात जायचे असेल तर आपण हे शिर्डी मधील ७५वे नामस्मरण रद्द करायचे.'
श्री. विकास सदगुरू भाऊमहाराजांच्या नित्यनियमाने चालणा-या संध्याकाळच्या आरतीला बसले. पण माझे लक्ष आरतीमध्ये लागेना. सद्गुरूंनीच इथपर्यंत आणले आहे, मग ते पुन्हा मागे का घेऊन जातील? मीसुध्दा श्रीसाईबाबांची लहानपणापासून अनन्यभावाने भक्ती केली होती. श्रीबाबांनीच मला सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या झोळीत टाकले आहे, हा माझा विश्वास होता. सद्गुरूंच्या या कार्यामध्ये श्रीसाईबाबांचे अखंड आशीर्वाद आपल्याला अनेक दृष्टांतरूपाने लाभले आहेत. असे असताना आज आमच्यावर एवढी मोठी यात्रा रद्द करण्याची पाळी का यावी? असे विचार राहून राहून माझ्या मनात घोंघावू लागले. ज्याठिकाणी देहंबुध्दीचा व्यापार संपतो तिथे आपलाच आपल्याशी आत्मिक सुसंवादाला सुरूवात होते हा अनुभव मी घेतला.
मागील यात्रांमध्ये सर्व सत्पुरूषांनी तसेच सदगुरू भाऊमहाराजांनी दिलेले असंख्य अनुभव आठवले. श्री. प्रकाश कारखानीसांचे शब्द आठवले की “श्रीसाईबाबांसमोर दुस-या कुठल्याही सत्पुरूषांचे नामस्मरण करण्याची आवश्यकताच काय आणि त्यांचा फोटो आतमध्ये नेण्याचा तुमचा अट्टाहास कशाला?" का कोणास ठाऊक आतून वाटले की या प्रकाश कारखानीस नामक व्यक्तीस आपणच पुन्हा फोन करून त्यांच्याशी बोलावे.
मनाच्या त्या आत्यंतिक अवस्थेमध्येच मी श्री. प्रकाश कारखानीस यांना फोन लावला . त्यांना दुपारच्या संभाषणाचा संदर्भ देऊन मी त्यांना सदगुरू भाऊमहाराजांच्या कार्याची व गुरूतत्वाच्या एकात्मतेची मला जमेल तशी थोडक्यात महिती सांगण्यास सुरूवात केली. त्यांनी सुरूवातीला शांतपणे सर्व ऐकून घेतले व मग त्यांनी सांगितले "गुरू हे सर्वश्रेष्ठच असतात. पण जर तुमची तुमच्या गुरूंवर एवढी श्रध्दा आहे व तुम्ही बाबांचीही भक्ती करता; तर मग बाबांकडे पाहून बाबांचे नामस्मरण करताना तुम्हाला बाबांमध्ये तुमच्या गुरूंचे दर्शन व्हायला हवे. त्याकरिता वेगळा तुमच्या गुरूंचा फोटो तुम्हाला शिर्डीमध्ये हवा कशाला?" व ते बराच वेळ याच मुद्दयावर बोलत राहिले.
मला एका गोष्टीची जाणीव होत होती की मी ज्या व्यक्तीशी वोलते आहे ती कोणी सामान्य व्यक्ती नसावी. तिच्या बोलण्यातून मला श्रीसाईबाबाच बोलत आहेत असे क्षणभर वाटले. मग मी तो विचार झटकून टाकला; कारण माझे बाबा आमच्याकडून घडत असलेल्या चांगल्या गोष्टीला कशाला विरोध करतील? माझी उरली सुरली सर्व आशा त्यांच्या बोलण्यामुळे संपुष्टात आली होती.
|