|
कुठून काय बळ आले आणि मी त्यांना म्हटले “तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने, अधिकाराने व ज्ञानाने मोठे आहात . तुमच्यासमोर मी काही बोलणे ही माझी योग्यता नाही. पण तरीही तुम्हाला एक प्रश्न विचारू का?" त्यांच्या होकाराचीही वाट न बघता माझे बोलणे पुढे चालू होते - “साईबाबा तुमच्याकडे आहेत, साईबाबा माझ्याकडेही आहेत. किंबहुना, जो जो माणूस श्रध्देने स्मरण करील, त्या प्रत्येक ठिकाणी बाबा आहेत. बरोबर ना? मग असं असतानाही तुम्ही, मी, आपण सर्वच जण वेळ काढून, पैसा खर्च करून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला का जातो ? याचे कारण म्हणजे परमेश्वर जरी सर्वात्मक असला तरी त्या त्या ठिकाणच्या त्या सगुण रूपाला तितकेच महत्व आहे. म्हणुनच श्रीसाईबाबा जरी समोर असले तरी सदगुरू भाऊमहाराजांचे सगुण रूप त्याठिकाणी विराजमान असणे आमच्यासाठी तेवढेच आवश्यक आहे. आणि जर हे शक्य होत नसेल तर आम्ही हे नामस्मरणच रद्द करतो.”
आज विचार करताना वाटते की, श्री. प्रकाश कारखानीस यांच्या रूपात जणुकाही श्रीसाईबाबाच माझी परीक्षा बघत होते. माझे हे एका दमातले बोलणे संपले आणि श्री. कारखानीस पहिल्यांदाच एकदम प्रेमळ स्वरात म्हणाले “तुमची सदगुरूंवर एवढी श्रध्दा आहे; तर मग तुम्हाला तुमच्या गुरूंचा फोटो आणि पादुका आत घेऊन जाण्यासाठी कोणाच्या परवानगीची किंवा माझ्या वशील्याची गरजच काय? तुम्ही निर्भिडपणे तुम्हाला जे योग्य वाटेल तसे आत जा. कदाचित तुम्हाला कोणी अडवणारही नाही, कदाचित तुम्हाला सन्मानाने नामस्मरण करायला मिळेल. कदाचित तेथे तुम्हाला एखादा चमत्कार वाटावा अशी प्रचितीही मिळेल. तुम्ही तुमचे नामस्मरण रद्द करू नका."
परमपूजनीय श्री. कारखानीस यांचे हे शब्द ऐकले आणि अत्यानंदाने मी खाडकन भानावर आले. त्यांच्या रूपातून माझ्या श्रीसाईचाच आशीर्वाद आम्हाला मिळाला होता. परमपूज्य श्रीअण्णांनीही “आपण करू या" असे सांगितले होते. आता निःशंक मनाने आम्ही तयारीला लागलो व शुक्रवार दिनांक ९ जून या दिवशी आम्ही श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथे सदगुरू आनंदयोगेश्वरांचे ७२वे नामस्मरण केले.
तेथून पुढे नाशिक येथे श्रीमती तिलोत्तमा कर्वे व श्री संजय लोंढे यांच्याकडे अनुक्रमे ७३ व ७४वे नामस्मरण व्हायचे होते. ही दोन्ही कुटुंबे, सदगुरू भाऊमहाराजांचे निस्सीम भक्त दांपत्य श्री. मनोज व सौ. शैला कोठारे यांचे नातेवाईक. सदगुरूंच्या इच्छेशिवाय आम्ही इथे नामस्मरण करणे शक्य नव्हते. कर्वे कुटुंबाने आमचे प्रेमपूर्वक स्वागत केले. त्यांच्याकडे नामस्मरण करून व प्रसादभोजन घेऊन संध्याकाळी आम्ही श्री. संजय लोंढे यांच्याकडे आलो. शेवटचे ७५वे नामस्मरण शिर्डी येथे होणार असल्याने, भक्त या सदरातील हे शेवटचे नामस्मरण होते . त्यामुळे आम्ही सर्वच जण अतिशय खुशीत होतो. श्री. लोंढे कुटुंबीयांनी सदगुरू आनंदयोगेश्वरांचे छान स्वागत केले. त्यांनी सद्गुरूंचे आसन तर इतके सुंदर सजवले होते की आम्हा सर्वाच्या तोंडातून “वा!" असे उद्गार निघाले . एकूणच सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या या ७४व्या नामस्मरणाचा थाट काही औरच होता. त्याचे कारणही तसे होते.
श्री . संजय लोंढे हे सौ. शैला कोठारे यांचे बंधू. ते नित्य नियमाने दत्तजयंतीला श्रीगुरूचरित्र सप्ताह अतिशय शूचिर्भूतपणे व शास्त्रोक्त पध्दतीने करतात. त्याशिवाय सद्गुरू भाऊमहाराज देहंरूपात असताना एकदा जेव्हा श्री. लोंढे यांनी सद्गुरू भाऊमहाराजांनी आपल्या घरी नाशिक येथे येण्याची इच्छा व्यक्त केली होती; तेव्हा काही कारणास्तव सदगुरू भाऊ त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत पण त्यांनी लोंढे कुटुंबीयांना सांगितले होते की “एक दिवस मी नाशिकला तुमच्या घरी नक्की येणार."
आज सदगुरूंनी आपला शब्द खरा केला; तोसुध्दा त्यांच्या ७५ व्या जयंतीप्रित्यर्थच्या नामस्मरण संकल्पाच्या निमित्ताने. लोंढे कुटुंबाकडील नामस्मरण अतिशय दणक्यात झाले. हे नामस्मरण सुरू असताना, सद्गुरू आनंदयोगेश्वरांनी आपल्या सगुण अस्तित्वाची प्रचिती, आपल्या फोटोच्या माध्यमातून उपस्थित भक्तांना दिली. त्यांच्या फोटोवरील मोठे फूल हे थोडे पुढे आले व त्याला मागे कुठलाही आधार नसताना नामस्मरण चालू असताना अखंड ते फूल लक्षात येईल इतक्या जोरात थरथरत होते. सद्गुरू भाऊमहाराजांची नजर जिवंत झाल्यासारखी भासत होती. समोर साक्षात् सदगुरू आनंदयोगेश्वर चैतन्यरूपात बसले आहेत असे वाटत होते.
|