|
या ठिकाणी बरेचसे अनोळखी लोकसुध्दा असल्याने नामस्मरण व आरती झाल्यानंतर श्री. विकास यांनी सद्गुरू भाऊमहाराज त्यांचे कार्य तसेच या ७५ नामस्मरण संकल्पाविषयी थोडा वेळ विवेचन केले. त्यानंतर श्री. संजय लोंढे यांनी उभे राहून आपल्याला हे नामस्मरण अतिशय आवडल्याचे सांगितले व आम्हाला अजुन १५ मिनिटे हे नामस्मरण करण्याची विनंती केली. त्यावेळी सर्व वातावरण काही वेगळेच झाले होते. समोर साक्षात् दत्तावतारी सद्गुरू बसले होते. आम्ही पुन्हा नामस्मरण केले. “दिगंबरा दिगंबरा वासुदेव गुरूभाऊ दिगंबरा” आणि “हे वासुदेव श्रीगुरूदत्त, आनंदयोगेश्वर निळकंठ" हे दोन नामजप सर्वांच्या तनमनात एवढे भिनले होते की सर्वांनीच त्या नामस्मरणाची अवीट अशी धुंदी अनुभवली.
त्या रात्री लोंढे कुटुंबीयांकडे सद्गुरू भाऊंच्या आवडीच्या पिठलं भातासह पक्वान्नाचे प्रसादभोजन घेऊन दुस-या दिवशी श्रीक्षेत्र शिर्डी येथे संपन्न होणा-या ७५व्या नामस्मरणासाठी आम्ही सिध्द झालो.
श्रीक्षेत्र शिर्डी येथे जाण्यापूर्वी सदगुरू प्रेरणेने आम्ही साकोरी येथील श्रीगोदावरी माता यांनी स्थापन केलेल्या 'कन्याकुमारी' मंदिरात गेलो. या ठिकाणी आम्हाला सदगुरूंनी का आणले असावे, असा विचार करीत असतानाच इंदोरचे परमपूज्य सदगुरू नाना महाराज तराणेकर यांचा फोटो आमच्या दृष्टोत्पतीस पडला . सद्गुरू नाना महाराजांनी जणू आम्हाला स्मरण करून दिले की 'हा जो संकल्प तुम्ही पूर्ण करण्यास जात आहात त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतली होती.'
त्या श्रीगोदावरीमातेच्या कन्याकुमारी मंदिरामध्ये दर्शन व प्रसाद घेऊन आम्ही श्रीक्षेत्र शिर्डी येथे आलो. नेहमीप्रमाणेच तेथे श्रध्दाळू भक्तांची बेफाम गर्दी उसळली होती. तरीही कुठेही गडबड गोंधळ नव्हता. दुपारची भर ऊन्हाची वेळ असूनसुध्दा भाविक जन रांगेत दर्शनासाठी उभे होते. केवळ सदगुरूंच्या विश्वासावर आम्ही हातात सद्गुरू आनंदयोगेश्वरांचा फोटो व पादुका घेऊन पुढे चाललो होतो. इतर भक्तांच्या हातात नामस्मरणासाठी लागणारे इतर सामान होते. कुठेतरी मनाच्या आतल्या कोप-यात एक अनामिक टेंशन होतेच. शेवटी मी एक सामान्य स्त्री होते. एवढया भक्तांना सद्गुरूंच्या नामस्मरणासाठी घेऊन आलो आहोत. जर आपल्याला अडवले तर किंवा सदगुरू भाऊंचे नामस्मरण करू दिले नाही तर ! एकाच वेळी हजार विचार डोक्यात येऊ लागले होते.
शिर्डी येथे सदगुरू आनंदयोगेश्वरांचे ७५वे नामस्मरण संपन्न
शिर्डीमधील श्रीसाईबाबांच्या मंदिराच्या आवारामध्ये मुख्य प्रवेशद्वारातून आत आम्ही प्रवेश केला मात्र मन एकदम शांत आणि निश्चिंत झाले. कुठल्याही विकाराशिवाय आणि विचाराशिवाय आम्ही आत जात होतो; नव्हे आता सदगुरू आम्हाला आत घेऊन चालले होते.
तेथील व्यवस्थापकांनी फोनवर सूचना दिल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या कार्यालयात गेलो आणि ते ही सदगुरू आनंदयोगेश्वरांचा फोटो आणि पादुका घेऊन . आम्हाला कोणीही अडवले नाही. आत गेल्यानंतर तेथील अधिका-यांना सर्व संदर्भ सांगितल्यावर त्यांनी आम्हाला स्टेजवर कुठून जायचे ते सांगितले व सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या कार्यालयातून थेट श्रीबाबांच्या समाधीसमोर जाण्याच्या दरवाजातून त्यांनी आम्हाला आत सोडले. आम्ही आमच्या श्रीसाईबाबांसाठी मुंबईहून येतानाच जरीची रेशमी शाल व रवा बेसनचे १०० लाडू करून आणले होते. श्री. प्रदीप यांच्या आईने ते १०० लाडू श्रीबाबांसाठी म्हणून अतिशय श्रध्देने स्वतः करून दिले होते.
मागील दरवाजाने थेट सदगुरू श्रीसाईनाथ महाराजांसमोर जातानाही आमच्या हातात सदगुरूंचा फोटो व पादुका होत्या. आम्ही बाबांच्या समाधीसमोर गेल्यावर तेथील पुजा-यांनी स्वतःहून आमच्याकडून तो फोटो व पादुका मागून घेऊन त्या श्रीसाईनाथ महाराजांच्या समाधीवर ठेवल्या. आम्ही बाबांसाठी आणलेली शाल त्यांनी श्रीबाबांना घातली व प्रसाद म्हणून आम्हाला परत दिली. आम्ही दिलेला लाडवांचा मोठा डबा त्यांनी श्रीबाबांसमोर ठेवून आम्हाला तो प्रसाद म्हणून दिला. जे जे आम्ही मनापासून करण्याचे योजिले होते ते सर्व भक्तवत्सल श्रीसाईनाथ महाराजांनी पूर्ण केले. श्रीसाईबाबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही स्टेजवर गेलो .
|