|
हा स्टेज अशाप्रकारे बांधण्यात आला आहे की, स्टेजच्या समोर श्रीसाईबाबांची समाधी व डाव्या बाजुला श्रीद्वारकामाई; ज्याठिकाणी आम्ही सदगुरूंच्या या कार्याची शपथ घेतली होती . किती समर्पक जागा त्या परमशक्तीने या ७५ व्या नामस्मरणासाठी निश्चित केली होती! या परमेश्वरीय शक्तीचे व्यवस्थापन किती अचूक असते याचा प्रत्यय आम्हाला आला. शिर्डी संस्थानचे कर्मचारी आम्हाला स्टेजपर्यंत घेऊन गेले. श्री. कारखानीस यांनी शेवटी सांगितलेल्या शब्दांची प्रचिती आम्ही घेत होतो.
त्या कर्मचा-यांनी आम्हाला उत्तम सहकार्य केले स्टेजवर जाजमे घातली, आम्हाला अजुन कशाची आवश्यकता आहे का ते विचारले. माईक हवा का विचारले असता आम्ही "नको" म्हणून सांगितले. आम्ही सद्गुरूंची खुर्चीही तिथे घेऊन गेलो होतो. त्यावर सदगुरू आनंयोगेश्वर निळकंठ महाराजांना विराजमान केले. आजपर्यंतच्या सर्व नामस्मरणांप्रमाणेच बाजुला आमचे परात्पर गुरू, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांना विराजमान केले. ७५ नामस्मरणाचा बोर्ड लावला. सदगुरू भाऊमहाराजांची खुर्ची उजव्या बाजुला थोडीशी तिरकी ठेवून आम्ही सर्व भक्त स्टेजवर श्रीसाईनाथ महाराजांसमोर बसलो. बरोब्बर ठरलेल्या वेळेवर नामस्मरण सुरू झाले.
"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परर्वम्ह तस्मै श्री गुरवे नमः'
असे म्हणून आम्ही सुरुवात केली. वातावरणातील चैतन्यलहरी आम्हाला जाणवत होत्या. श्री . विकास यांनी ढोलकी वाजवण्यास सुरूवात केली. मी व माझ्यामागून सर्वांनी अशाप्रकारे श्रीसाईनाथ महाराजांचे गजर म्हणण्यास सरूवात केली. :
'भेट द्या मला साईनाथा, राघवा कृष्णा श्रीदत्ता' आणि 'साई दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो' आळवून आळवून म्हटलेले हे गजर खरोखरंच साक्षात् साईबाबा, समोर बसून ऐकत आहेत असे भासत होते.
५ मिनिटांनी श्री. विकास यांनी सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या "दिगंबरा दिगंबरा वासुदेव गुरुभाऊ दिगंबरा" या नामस्मरणाला सुरूवात केली. आम्ही सर्व तल्लीन झालो होतो. ७ ते ८ मिनिटांनी त्यांनी मला म्हणण्यास सांगितले. मी नामस्मरण म्हणण्यास सुरूवात केली आणि एवढ्यात तिथे एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने श्री. विकास यांना 'मी ढोलकी वाजवतो' अशा अर्थाची खूण केली व ढोलकी वाजवायला घेतली सुध्दा. आम्ही सर्वजण चक्रावून गेलो. आतापर्यंत एवढ्या नामस्मरणांमध्ये असे पहिल्यांदाच घडले होते. श्री. विकास यांनी मी वाजवत असलेली झांज स्वतः वाजवायला घेतली आणि पुढची १५ मिनिटे आम्ही आमचे राहिलो नाही.
ती अनामिक व्यक्ती ज्याप्रकारे ढोलकी वाजवीत होती ते ऐकून मला श्रीशंकराच्या तांडवनृत्याची आठवण होत होती. एवढेच नाही तर ती व्यक्ती ढोलकी वाजवताना मध्येच स्वतःचे डोळे बंद करीत होती तर मध्येच कितीतरी वेळ मान खाली आणि नजर मात्र वर अशा त-हेने माझ्याकडे एकटक पहात वाजवत होती. माझ्या अंगावर त्याही वेळी रोमांच उभे राहिले होते. मी नामस्मरण सांगताना स्वतःला पूर्णपणे विसरून गेले होते. माझे पती श्री. विकास हेसुध्दा देहंभान विसरून झांज वाजवत होते. असे हे नामस्मरण सुमारे १५ मिनिटे चालू होते.
|