|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

मध्येच मी थोडीशी भानावर आले व नामस्मरण सांगण्याचा आनंद सर्वाना मिळायला हवा या नेहमीच्या शिस्तीने मी श्री. चोरगे यांना पुढचे नामस्मरण सांगण्यास सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीने ढोलकी वाजवणे थांबवले. आम्हा सर्वाकडे एक दृष्टीक्षेप टाकला व श्री. विकास यांच्याकडे ढोलकी सरकवून ती जायला निघाली. मी श्री. प्रदीप यांना त्या व्यक्तीला प्रसादलाडू देण्यास सांगितले व आम्ही नामस्मरण करू लागलो. श्री. प्रदीप यांनी त्यांना स्टेजजवळ बोलावून त्यांना प्रसाद दिला. वास्तविक पाहता, एखादी व्यक्ती प्रसाद घेऊन काही न बोलता निघून गेली असती; कारण आमचे नामस्मरण चालू होते. परंतु त्या व्यक्तीला आम्ही काही विचारलेले नसतानाही ती आमच्याकडे पाहून म्हणाली “आम्ही इंदोरवरून आलो आहोत" आणि पाठमोरी होऊन निघून गेली. आम्ही पहातच राहिलो.

"इंदोरवरून" म्हणजे? हृदय हेलावून गेले. डोळयांतून पाणी ओघळू लागले. भोळी भाबडी गुरूसेवा करणाऱ्या आपल्या भक्तांना दृष्टांतात दिलेला शब्द पाळण्यासाठी साक्षात् सदगुरू नाना महाराज तराणेकर इंदोरवरून येऊन गेले होते. आठवण झाली की जेव्हा आम्ही दोघांनी सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठमहाराजांच्या ७५ व्या जयंतीवर्षाप्रित्यर्थ ठिकठिकाणी ७५ नामस्मरणे करण्याचा संकल्प केला होता; तेव्हा हा संकल्प पूर्ण होण्याची सर्व जबाबदारी परमपूज्य श्रीनानांनी घेतली होती. आणि आज बरोब्बर ७५व्या नामस्मरणाला नामस्मरण संकल्प पूर्ण होताना त्यांनी आम्हाला साक्षात्कार देऊन आम्हाला याची जाणीव करून दिली की त्यांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळला आहे. या साक्षात्काराला आमच्याबरोबर असलेले सर्व भक्त साक्षी होते.

त्याचवेळी श्री. कारखानीस यांनी सांगितलेले शब्द पुन्हा आठवले की “कदाचित तेथे तुम्हाला एखादा चमत्कार वाटावा अशी प्रचितीही मिळेल”.

नामस्मरणानंतर आरती करून आम्ही द्वारकामाईमध्ये दर्शनासाठी रांगेत उभे होतो. रांग खूप मोठी होती; त्याचप्रमाणे पुष्कळ माणसं मध्ये घुसत होती. या पार्श्वभूमीवर आम्ही जेव्हा आतमध्ये दर्शनासाठी प्रवेश करते झालो बरोब्बर त्याचवेळी तिथले एक पुजारी तिथे आले. काही सेकंद जरी आम्ही पुढे गेलो असतो किंवा मागे राहिलो असतो तर कदाचित ते पुजारी तिथे आम्हाला भेटले नसते. त्यांनी स्वतःहून आम्हाला थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी तिथेच मागे असलेली एक लहानशी खोली उघडली व तिथून एक लहानशी वाटी आणली. त्या वाटीमध्ये श्रीसाईबाबांना लावतात ते चंदनाचे गंध होते. पुजा-याने ते गंध सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या कपाळावर लावले, पादुकांना लावले व त्यानंतर श्री. विकासना व मला लावले. अशाप्रकारे सद्गुरू श्रीसाईनाथ महाराजांनी आम्हाला भरभरून दिले. आम्ही तृप्त झालो.

अशाप्रकारे ७५ नामस्मरणांचे केवळ निमित्त साधून सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांनी या सर्व यात्रांमध्ये त्यांच्या भक्तांना दिलेल्या शब्दाची पूर्तता तर केलीच, पण त्याशिवाय पदोपदी अनेकविध प्रचिती देऊन आम्हाला त्यांच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या मनःशक्तीचे बळ दिले. या सर्व नामस्मरण यात्रा म्हणजे सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या 'आनंदयोग धाम' वरून चालू असलेल्या कार्यासाठी मैलाचा दगड ठरला. चराचर सृष्टीमध्ये वैश्विक चैतन्य निरनिराळया रूपामध्ये प्रकट होत असते. या यात्रांच्या माध्यमातून त्या सर्व चैतन्याचा स्त्रोत एकत्रित करून, त्यातून आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांच्या पादुका स्थानावर येणा-या भक्ताला त्याच्या इष्टदेवतेचा प्रत्यय यावा आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये आनंद मिळावा हाच या सर्व घटनांचा बोध होऊ शकतो. कारण सदगुरू भाऊमहाराज देहंरूपात असताना कधी कोणाला ते साईच्या रूपात दिसले, तर कधी श्रीस्वामी समर्थाच्या रूपात दिसले, तर कधी साक्षात् टेंबेस्वामी महाराजांच्या रूपातही दिसले. 'जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव' या भावोक्तीप्रमाणे; जे जे कोणी सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या या पादुका स्थानावर

येतील; त्या प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आनंद मिळावा - हीच सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून हा साक्षात्कारी अनुभूतींचा आणि नामाच्या अनुभवामृताचा कलश आम्ही श्रध्दापूर्वक सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या चरणी अर्पण करतो.



<< Previous      Next >>