|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

भक्तांच्या अनुभवांची ओंजळ

१.सौ. सुधा जयंत मडकईकर
खरं सांगायचं तर सदगुरू आनंदयोगेश्वर देहंरूपात असताना माझा तसा त्यांच्याशी कधीही संपर्क आला नाही. माझी आई व बहिणी अनेक वर्षे सदगुरू भाऊमहाराजांनी स्थापन केलेल्या 'ओम् सदगुरू प्रतिष्ठान' या स्थानावर जात असल्यामुळे बोरीवली व खोपोली या स्थानांशी माझा अप्रत्यक्षरित्या परिचय होता. त्याचप्रमाणे, त्यांच्या शिष्यांनी स्थापन केलेल्या त्यांच्या पादुका स्थानावर मी काही रविवार आरतीसाठी जात असे. एकदा सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठमहाराजांच्या या पादुका-स्थानाच्या एका वर्धापन दिनाला त्यांचे पाद्यपूजन होते. त्यावेळी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन मला झाले होते. माझ्या जीवनात झालेले हे त्यांचे एकमेव दर्शन; ज्याचे महत्व मला आज कळते आहे.

जानेवारी २००४च्या सुमारास मी मनातल्या मनात जसे जमेल तसे नामस्मरण करीत असे. हळूहळू माझ्याही नकळत हे नामस्मरण माझ्याकडून अखंड होऊ लागले. फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान एका रविवारी दुपारी मी नामस्मरण करीत झोपले असता मध्येच मला दचकून जाग आली आणि माझी नजर समोरच शोकेसमधील सद्गुरू भाऊमहाराजांच्या छोटया तसबिरीकडे गेली. जे पाहिले त्याने मला आश्चर्याचा धक्काच वसला. सद्गुरू भाऊमहाराजांचा उजवा हात चक्क आशीर्वाद देण्यासाठी वर उचलला होता. मी स्तब्ध झाले. घाम फुटला. वास्तविक पाहता नामस्मरण करताना सद्गुरू भाऊ माझ्या मनात कधीच नव्हते. त्यांना स्मरून मी कधीही नामस्मरण केले नव्हते. पण इतर नामस्मरणांबरोबर मी काही वेळा “दिगंबरा दिगंबरा वासुदेव गुरुभाऊ दिगंबरा" हे नामस्मरणही म्हणत असे. 'जेथे नाम तेथे मी' या सदगुरूंच्या वचनाचा अनुभव मला अशाप्रकारे आला.

पहिल्यापासून माझ्याकडून साईबाबांची भक्ती घडली होती. काही अनुभवांमुळे साईबाबांवर पूर्ण विश्वास होता. पण साईबाबांनीच दिलेल्या काही उत्तरांमुळे ही 'सदगुरू भाऊमहाराज' ही प्रतिमा हळुहळू आकारत गेली.

कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही; पण साईबाबांनी माझ्या लग्नाच्या बाबतीत माझ्या लहान लहान इच्छाही पूर्ण केल्या. त्याचप्रमाणे लग्न ठरल्यानंतर माझी कुंडली बघणे, पत्रिकेचे डिझाईन ठरवणे, लग्नाच्या आनंदाप्रित्यर्थ माझ्याबरोबर भोजन करणे या सर्व गोष्टी सद्गुरू भाऊमहाराजांनी माझ्या स्वप्नात येऊन केल्या होत्या. साईबाबांनी दिलेली उत्तरे मला उमगू लागली होती.

तरीही माझे लग्न झाल्यानंतर आमच्यावर आलेल्या एका संकटातून मार्ग मिळवण्यासाठी सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या पादुका स्थानावर जाण्यास मी कचरत होते. पण आता वाटते की, कदाचित ते संकट म्हणजे एवढी मोठी अनुभूति मिळूनही गुरूचरणाकडे न वळणार्‍या माझ्यासारख्या स्त्रीला त्यांच्याजवळ आणण्याचे एक निर्मित्त ठरले असावे. त्यावळी माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून व साईबाबांवर विश्वास ठेवून मी 'आनंदयोग धाम' या सदगुरू भाऊमहाराजांच्या पादुका स्थानावर जाण्यास तयार झाले.

त्यानंतरच्या शनिवारी मी व माझे यजमान आम्ही दहिसर येथे डॉक्टरकडे गेलो होतो . तिथून सदगुरूंचे पादुका स्थान जवळ असल्यामुळे मी डॉक्टरकडून तेथे जाण्याचे ठरवले. तसा खामकरांकडे फोन केल्यावर सौ. श्रध्दा म्हणाल्या की “माझी तब्बेत बरी नसल्यामुळे मी रात्री डॉक्टरकडे जाणार आहे. तर तुम्ही थोडे लवकर या. " पण आमच्या डॉक्टरकडे उशीर झाला आणि नंतर सौ श्रध्दासुध्दा त्यांच्या डॉक्टरांचे क्लिनिक बंद होईल म्हणून घाईघाईत निघून गेल्या आणि त्यादिवशी आमची भेट झाली नाही. दुस-या दिवशी रविवारी सकाळीही भेट होऊ शकली नाही. मी थोडीशी निराश झाले. आपल्याला कोणीतरी मुद्दाम भेटायला मागत नाही, असा विचार राहून राहून माझ्या मनात येऊ लागला. रविवारी संध्याकाळच्या नित्य आरतीला मी व माझे यजमान श्री. जयंत आम्ही गेलो. आरती संपल्यावर काही भक्त थांबले होते त्यांच्या अध्यात्मिक गप्पा सुरू झाल्या. त्यातील एका गणात्रा नामक गुजराथी दांपत्याने त्यावेळी तेथे प्रसाद म्हणून चना चाट वाटला होता. या गप्पा चालू असताना सौ. श्रध्दा यांनी हा वेगळाच प्रसाद वाटण्यामागचे कारण काय असे सौ. गणात्रा यांना विचारले . तेव्हा त्या म्हणाल्या "काल माझ्या स्वप्नात भाऊमहाराज आले होते. त्यांनी माझ्याकडे चाट खाण्याची इच्छा प्रकट केली. त्यानंतर एक दुःखी दांपत्य सद्गुरू भाऊंना भेटायला आले पण भाऊ त्यांना भेटत नव्हते तेव्हा स्वप्नातच मी भाऊंना विचारले की तुम्ही यांना का भेटत नाही. ते खूप दुःखी आहेत त्यावर सदगुरू भाऊ म्हणाले की माझी तब्येत बरी नाही आणि मी यांना भेटणार नाही."

हे स्वप्न सांगून झाल्यावर सौ. गणात्रा पुढे म्हणाल्या “असे स्वप्न मला का पडले मला माहित नाही. पण सदगुरू भाऊंनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे आजच मी हा चाटचा नैवेद्य त्यांना दाखवला व तो इथल्या भक्तांसाठी आणला. " हे सर्व मी बाजुला उभी राहून ऐकत होते. ऐकता ऐकता मला एकदम रडूच कोसळले . मी त्या सर्वासमक्षच सांगितले की “यांना पडलेले स्वप्न ही माझीच कहाणी आहे. कारण आदल्या दिवशी ज्यांच्या घरी सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे हे स्थान आहे, त्या सौ. श्रध्दा आजारी असल्यामुळे माझी सदगुरू भाऊमहाराजांशी भेट होऊ शकली नव्हती. आणि या स्वप्नात थोडयाशा अविश्वासानेच त्याठिकाणी येणा-या मला भेटण्यास, सदगुरू भाऊमहाराजांचा नकार होता तोही आजारपणाचे कारण सांगुनच.

<< Previous      Next >>