|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

तरीही आज संध्याकाळी ते मला भेटले आणि मुख्य म्हणजे त्या भेटीची साक्ष म्हणून, मला अतिशय आवडणारा चना चाट देऊन, त्यांनी त्यांच्या पादुका स्थानावर माझे स्वागतच केले. त्यानंतर सदगुरू भाऊमहाराजांच्या या पादुका स्थानावर आम्ही दर रविवारी नित्य नियमाने आरतीसाठी येऊ लागलो. संकटे तर एकामागून एक येतच होती. आतून मी बरीचशी खचले होते. एकटी पडले होते . पण तो निराशेचा भाव चेह-यावर न दाखवता मी माझ्या यजमानांच्या मागे ठामपणे उभी होते. या निराशेमुळे मी पूर्वी एक दोनदा ज्यांच्याकडे गेले होते त्यांना एकदा भेटावे असे मला वाटू लागले.

एका रविवारी सद्गुरू भाऊमहाराजांच्या पादुका स्थानावर आरती चालू असताना मी माझे हे सर्व विचार सदगुरू भाऊंकडे कबूल केले आणि माझी द्विधा मनस्थिती त्यांना मनातल्या मनात सांगितली. आरतीतील शब्द न शब्द मी नकारात्मक गुंफत बसले होते. आरती सुरू असतानाच मी भाऊंना मनात विचारले की “तुम्ही कोण आहात? तुम्ही इथे आहात का? पूर्वी मी एक दोनदा जिथे गेले होते; तिथे सर्वात शेवटी डोळे बंद करून हात जोडल्यावर आशीर्वादरूपी तीर्थ शिंपडले जात असे; ज्याने माझे मन प्रसन्न होत असे. जर तुम्ही इथे आहात, तर अनुभव का येत नाही? माझा हा मार्ग बरोबर तआहे ना?” असे एक ना दहा प्रश्न मी आरती सुरू असतानाच सदगुरू भाऊंना विचारत होते.

आरती संपली. मी मात्र रडवेली झाले होते. तेवढयात श्री. विकास खामकर यांनी सर्वांना हात जोडून डोळे मिटायला सांगितले आणि थोडयाच वेळात माझ्या अंगावर तीर्थाचा वर्षाव झाला - तेही गाणगापूरच्या . मी शांत झाले. माझे मन शांत झाले. उरला तो फक्त निःशब्द भाव. माझ्या प्रश्नांना उत्तरे मिळाली. असा तीर्थ वर्षाव सदगुरू भाऊमहाराजांच्या पादुका स्थानावर प्रथमच झाला होता व त्यानंतर आजपर्यंत कधी झाला नाही. ही साक्षात्कारी अनुभूति देऊन माझ्या सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांनी मला धन्य केले.

त्या दिवसानंतर आमचे प्रॉब्लेम्सही हळुहळू सुटू लागले. आता वाटते ज्या शेकडो भक्तांनी सदगुरू आनंदयोगेश्वरांना नित्य पाहिले अनुभवले त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीत किती भरभरून असेल ना! अशा या गुरूंचे ऋण आपण फेडू शकत नाही पण त्यांचे नामस्मरण करून आणि त्यांनी सुरू केलेल्या कार्याची ज्योत तेवत ठेवून आपण कृतज्ञ तर नक्कीच बनू शकतो.

आज म्हणावेसे वाटते :
तुझ्या कृपेचे छत्र असावे
माझे घर तुझे स्थान असावे

२. श्री. मनोज कोठारे
तसे म्हटले तर माझी परमपूज्य भाऊमहाराजांशी पहिली भेट १९८८ मध्ये झाली होती. त्या पहिल्या भेटीतच सदगुरू भाऊंनी माझ्या जन्मस्थानाची सर्व माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की "जिथे तुम्ही रहाता त्याच्या चारही बाजुला मंदिरे आहेत आणि तेथे पूर्वी एक नदीचे पात्र होते .” त्यांनी जे सांगितले ते तंतोतंत खरे होते. मी माहीम येथे ज्याठिकाणी रहायचो त्याच्या चारही बाजुला खरोखरंच मंदिरे होती. त्यातील एक श्रीदत्तात्रेयांचे होते. त्याचप्रमाणे तेथे नदीचे पात्रही पूर्वी होते. त्यावेळी मी मनापासून त्यांच्यासमोर नतमस्तक झालो .

दुसरी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे माझे सासरे श्री. लोंढे यांच्यामध्ये व गुरूवर्य भाऊमहाराजांच्या दिसण्यामध्ये कमालीचे साम्य होते. १९८७ साली माझ्या सास-यांचे देहावसान झाले व त्याच वेळेला सदगुरू भाऊमहाराजांच्या रूपात माझ्या पत्नीला व मला वडीलकीचा आधार मिळाला. त्यावेळी आम्ही नित्यनियमाने दर गुरूवारी भाईंदरवरून सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या दर्शनाला बोरीवली येथे यायचो. त्यामुळे आम्हाला खूप त्रास व्हायचा. एकदा खोपोलीला माझी पत्नी सौ. शैला हिने सहज बोलता बोलता सदगुरू भाऊमहाराजांना सांगितले की “भाऊ, सिध्देश आता ३ वर्षाचा झाला आहे. आरती आणि दर्शन करून घरी पोचण्यास आम्हाला रात्रीचे ११ ते ११.३० वाजतात." त्यावर सद्गुरू भाऊमहाराज पट्कन बोलले "काळजी करू नकोस. पुढल्या वर्षीपासून तुझी समस्या कमी होईल" आणि खरोखरंच ध्यानी मनी स्वप्नी नसताना १९९३ साली आम्ही बोरीवली येथे रहाण्यास आलो.

<< Previous      Next >>