|
माझा पगार फारच कमी होता पण सदगुरू भाऊंच्या शब्दावरील विश्वासाने आम्ही हे धाडस केले. सदगुरू भाऊ आपल्या समवेत आहेत याची आम्हाला खात्री होती. त्याची प्रचिती देत आमच्या या घरामध्ये स्वतः सद्गुरू भाऊमहाराज आले व आमच्याकडून त्यांचे पाद्यपूजन झाले. घर तसे फारच लहान परंतु संदर होते. पण मानसिक स्थिती ठीक नव्हती कारण ह्या जागेसाठी जे कर्ज घेतले होते त्याचा हप्ता भरणे हा मोठाच प्रश्न होता. यावेळी पुन्हा एकदा आमची ही समस्या आम्ही सदगुरू भाऊंसमोर मांडली. तेव्हाही सदगुरू भाऊ पटकन म्हणाले "बाळ घाबरू नकोस. पुढल्या वर्षी महाराज तुझ्या कर्जाचा हप्ता भरण्याची व्यवस्था करतील.
आणि काय आश्चर्य! सदगुरूंची वाणी म्हणजे काळया दगडावरची रेघच. मनामध्ये पूर्ण श्रध्दा असेल तर अनुभव येतोच. त्याचवेळी जून १९९५ मध्ये मला प्रमोशन मिळून माझ्या कंपनीमध्ये इ. डी. पी. अधिका-याचे पद मिळाले आणि माझा पगारही वाढला व आजपर्यंत वाढतच आहे.
मनुष्यस्वभावानुसार एक इच्छा पूर्ण झाली की त्यापाठोपाठ दुसरी इच्छा तयारच असते. आमचेही असेच झाले. पगार वाढला; त्यामुळे आहे ते घर अजुन लहान वाटू लागले. म्हणून पुन्हा एकदा सदगुरू भाऊमहाराजांना भेटून मोठी जागा घेण्याविषयी विचारले. यावेळेला तर स्वतः भाऊमहाराज आमच्या बरोबर अनेक जागा बघायला आले आणि आम्ही सध्या ज्या रहेजा इस्टेट' मध्ये रहात आहोत त्या जागेचे बुकींग स्वतः सद्गुरू भाऊमहाराजांनी केले. आज त्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडे एक चांगल्या वसाहतीतील चांगला फ्लॅट, स्कूटर व मोटर कार आहे ज्याची मी स्वप्नातसुध्दा कल्पना केली नव्हती.
एवढी सर्व ऐहिकाची पूर्तता होऊनसुध्दा २००४ साली सदगुरू भाऊमहाराजांनी देहं ठेवल्यानंतर, मी या मार्गापासून थोडा लांब गेलो. माझी पत्नी मात्र सद्गुरूंच्या अनुसंधानामध्ये होती. त्यामुळेच असावे की काय, एकदा ती विमनस्क अवस्थेमध्ये असताना तिला स्वतः सदगुरू भाऊमहाराजांनीच खामकरांकडे असलेल्या त्यांच्या पादुका स्थानावर जाण्यास सुचवले. त्यानंतर ती पूर्ण श्रध्देने 'आनंदयोग धाम' या सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या पादुका स्थानावर रविवारच्या आरतीस जाऊ लागली. त्यावेळी मी फक्त तिला त्याठिकाणी नेण्याचे काम करायचो.
कधीतरी चुकून आरतीला थांबायचो. तसा मी नास्तिक नव्हतोच. गुरुवर्य भाऊंचे मला अनेक अनुभवही आले होते. पण तरीही न येण्याचे कारण काय हे मला कळत नव्हते. ९ जुलै २००५ या दिवशी संपन्न झालेल्या सदगुरू भाऊमहाराजांच्या ७५ व्या वर्धापन दिनाला आम्हा दोघांना त्यांचे पाद्यपूजन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा मी अधुन मधुन तेथे जायला सुरूवात केली.. ज्यांच्या घरी जात होतो त्या सौ. श्रध्दावहिनी व श्री. विकास कुठलीही अपेक्षा न ठेवता ज्या तन्मयतेने सदगुरू भाऊमहाराजांचे कार्य करीत होते ते पाहून मी माझ्या मूळ मार्गावर येण्याचा प्रयत्न करीत होतो; नव्हे सद्गुरूच मला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करीत होते. कदाचित माझे पूर्वसुकृत चांगले असेल किंवा लहानपणापासून काही काळ माझ्याकडून देव धर्म व संतसेवा घडल्यामुळे असेल, मी काही ना काही निमित्ताने सद्गुरूंच्या जवळ येत होतो.
काही काळ असाच गेला व सद्गुरू भाऊमहाराजांच्या ७५ नामस्मरण संकल्पाच्या निमित्ताने ज्या यात्रा काढल्या; त्यापैकी शेवटच्या शिर्डी यात्रेमध्ये मी खामकरांबरोबर गेलो. त्याच काळात केव्हा तरी एकदाच माझ्या मनात विचार आला की "भाऊ, बरेच वर्षे झाली, कंपनीत मला काही अतिरिक्त मिळाले नाही." आणि काय आश्चर्य! यात्रेवरून मुंबईत आल्यावर काही दिवसांतच मला कंपनीच्या संपूर्ण भारतातील शाखांमधून चांगल्या कार्यक्षमतेबद्दल, कंपनीकडून प्रशस्तीपत्रक मिळाले व रोख स्वरूपात भत्ताही मिळाला.
माझा मित्र परिवार मोठा असल्यामुळे केव्हा केव्हा माझी त्यांच्याबरोबर ड्रिंक्सची बैठक होत असे. परंतु जसजसा मी सदगुरू भाऊंच्या पादुका स्थानावर जाऊ लागलो तस तसे काय जादू व्हायची मला कळत नसे; पण मी त्यांच्या बरोबर बसलो की माझा ग्लास हातातल्या हातात रहात असे. तो ग्लास जड होत जाई. आजही मी नेहमीप्रमाणे मित्रमंडळींबरोबर बसतो; पण मला त्या गोष्टीचा मोह होत नाही.
अशाप्रकारे सद्गुरू भाऊमहाराजांनी मला पुन्हा या अध्यात्माच्या मार्गावर आणून माझ्या जीवनात निखळ आनंद निर्माण केला. अर्थात् याचे अर्धे श्रेय माझ्या पत्नीचेही आहे. कारण तिची सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांवर निस्सीम श्रध्दा असल्यामुळेच, केवळ तिच्याच माध्यमतून मी 'आनंदयोग धाम' या सदगुरू भाऊमहाराजांच्या पादुका स्थानापर्यंत आलो व मला माझ्या जीवनातील सदगुरूंच्या सगुण अस्तित्वाची जाणीव झाली.
|