|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

श्री. राजन राणे, देवगड
मला व माझ्या पत्नीला अध्यात्म, गुरू वगैरे विषयांची फारशी आवड व माहिती नव्हती. परंतु एकदा माझ्या ओळखीतील सद्गुरूंचे कार्य करणारे श्री. पाध्येकाका यांनी केलेल्या नामस्मरण संकल्पांतर्गत, आमच्या घरी नामस्मरण करण्याचे ठरले. खरे म्हणजे, हे नामस्मरण कसे होणार, कोण करणार याविषयी माझ्या मनात खूप शंका होत्या. त्यात श्री. पाध्येकाका म्हणाले की "प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचे अलौकिक कार्य करत असलेले सदगुरू भाऊमहाराज नामक सत्पुरूष इथे त्यांच्या एका भक्ताकडे आले आहेत. जर का तुला तुझ्या घरच्या नामस्मरणाला त्यांनी यावे असे वाटत असेल, तर या ठिकाणी जाऊन त्यांना आमंत्रित कर." असे म्हणून त्यांनी मला पत्ता दिला. मी त्याठिकाणी गेलो तर एक अतिशय प्रसन्न व तेजःपूंज चेह-याच्या व्यक्तीचे तिथे असलेली भक्तमंडळी पाद्यपूजन करत होते.

मी त्या व्यक्तीला मी तेथे येण्याचे कारण सांगितल्यावर त्या व्यक्तीने मला थोडा वेळ थांवण्यास सागितले. एकंदर तेथील भक्तांची गर्दी पाहून ती व्यक्ती माझ्यासारख्या अनोळखी माणसाकडे येईल याची आशा मी सोडून दिली. परंतु प्रत्यक्षात मात्र सर्व कार्यक्रम संपल्यानंतर त्या सत्पुरूषांनी त्यांच्या बरोबरच्या एका भक्तास माझ्याकडे बोट दाखवून सांगितले की "आपल्याला याच्या घरी जायचे आहे." मी आश्चर्यचकित झालो; कारण तत्पूर्वी त्या सत्पुरूषाच्या एका जवळच्या भक्ताने मला त्या सत्पुरूषांना माझ्या घरी येण्यास वेळ नसल्याचे सांगितले होते..

ज्या दिवशी ती विभूति माझ्या घरी त्या नामस्मरणाच्या निमित्ताने आली त्यावेळी आमची दोघांची अवस्था ‘ते आले, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले अशीच झाली होती’ . कसलाही पूर्वानुभव नसतानाही, त्यादिवशी आमच्या घरचे नामस्मरण खूपच रंगले. ही घटना १९९४ सालातील त्या दिवशी त्या सत्पुरूषांनी, म्हणजेच आमची गुरूमाऊली सदगुरू भाऊमहाराजांनी आमच्या घरातच नव्हे; तर जीवनात प्रवेश केला व ख-या अर्थाने आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. त्यानंतर आम्ही दोघेही नियमाने आरतीसाठी स्थानावर त्यांच्याकडे जाऊ लागलो.

त्यांच्या या पहिल्या भेटीसारखीच, त्यांनी स्थापन केलेल्या खोपोली येथील श्रीस्वामी महाराजांच्या स्थानावर त्यांनी माझ्याकडून करून घेतलेली सेवाही माझ्यासाठी आकस्मिकच होती. १९९४ साली श्रीस्वामी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सद्गुरू भाऊमहाराजांना श्रीविष्णुरूपी वाडी भरण्यात आली होती व त्या सर्व कार्यक्रमाची सजावट त्यांनी माझ्याकडून करवून घेतली. करवून घेतली असे म्हणण्याचे प्रयोजन म्हणजे त्यावेळी मला खूपच डोळे आले होते. तरीही एका विशिष्ट उर्जेने झपाटल्यासारखा मी त्या सजावटीचे काम करत होतो. एवढयात लाईटही गेले. त्यावेळी सदगुरू भाऊमहाराज तेथे आले व मला म्हणाले "तुझे हे काम पूर्ण झाले की मला सांग" व ते काम पूर्ण होईपर्यंत सदगुरू भाऊ समोर बसून राहिले. एवढे डोळे आले असतानाही, दिवस रात्र काम करून ते सजावटीचे काम मला पूर्ण करता आले. - नव्हे माझ्या गुरुमाऊलीने ते उत्तमपैकी पूर्ण करून घेतले. ही १९९४ सालातील गोष्ट. त्याच वर्षी आम्ही दोघांनी त्यांचा अनुग्रह घेतला.

त्यानंतर मी स्थानावर प्रिंटिंग व सजावट या दोन सेवा मला जास्तीत जास्त जसे जसे शक्य होईल व सदगुरूंची आज्ञा होईल तसतसे करीत राहिलो . १९९५ साली सदगुरू भाऊमहाराजांनी केलेल्या १११ कोटी लिखित नामजपाच्या डाय-यांच्या सेटचे डेकोरेशनही त्यांना माझ्याकडून करून घेतले. त्याच्या पदयात्रेसाठी निघताना माझ्या खिशात फक्त १०० रूपये होते, आता खोपोलीपर्यंत कसे जायचे या विचारात असतानाच माझा एक पूर्वीचा देणेकरी अचानक मी निघतानाच आला व २०० रूपये देऊन गेला. माझ्या सदगुरूंनी अशाप्रकारे स्वतःच माझी सोय केली, अशाप्रकारचे अनुभव मी माझ्या दैनंदिन जीवनात अनेक वेळा घेतले.

<< Previous      Next >>