|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

सद्गुरू भाऊमहाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर काही दिवसातच माझी उदरनिर्वाहाची सगळी कामे बंद झाली, पण वाईटात चांगले म्हणजे त्यावेळी काहीच काम नसल्यानेच केवळ मला सेवेसाठी स्थानावर जायला वेळ मिळायचा. अनेकदा मला विरारहून बोरीवलीला येण्यासाठी तिकिटाला पैसे नसायचे, पण तरीही आम्ही गुरूवार व शनिवार कसेही करून स्थानावर नियमाने जायचो. अशा नकारात्मक परिस्थितीमध्येच तर त्या भक्ताची खरी परीक्षा असते, मी माझ्याकडील कामगारांना काहीच काम नसल्याने संकल्पातील डाय-या लिहिण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य! त्या नामजपामुळे पुढील ८ दिवसांत माझे काम पूर्वीपेक्षाही चांगल्या पध्दतीने सुरू झाले.

त्यानंतर १९९९ सालामध्ये निघालेली पदयात्रा मी जीवनात कधीच विसरू शकत नाही, त्या वेळी मला सदगुरू भाऊमहाराजांनी बोलावून घेतले व ते मला म्हणाले "आपल्याला महाराजांचा रथ करायचा आहे आणि तो रथ जात असताना 'महाराज' चाललेत असं वाटलं पाहिजे.” ते करून घेत गेले, सर्व गोष्टी आपोआप होत गेल्या व सर्व भक्तांनी मिळून तो रथ १५ दिवसांत पूर्ण केला. पदयात्रा निघण्याच्या दिवशी ज्यावेळी सदगुरू भाऊंनी तो रथ बघितला, तेव्हा त्यांच्या डोळयांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले. ती संपूर्ण रथयात्रा अतिशय छान पार पडली. त्यावेळी दत्तजयंतीचा संपूर्ण कार्यक्रम आटपल्यानंतर, रात्री उशीरा सदगुरू भाऊमहाराज मला म्हणाले - "राणे, परत एकदा बघूया तुम्ही केलेला रथ, मला तो रथ डोळे भरून पाहू दे, ” ते स्वतः अतिशय सद्गदित झाले होते. त्याच भावावेगाने त्यांनी पट्कन स्वतःच्या अंगावरची शाल काढून माझ्या अंगावर घातली.

माझ्या जीवनातील तो परमोच्च आनंदाचा क्षण होता. माझ्या सद्गुरूंच्या स्वप्नपूर्तीचा. त्यासारखा आनंद दुसरा असूच शकत नाही. उद्या मी लाखो करोडो रूपये जरी कमावले, तरी हा शाश्वत आनंद मी मिळवू शकणार नाही. अशा अनेक अनुभूतींनी उपकृत होत मी सदगुरू भाऊमहाराजांच्याच परवानगीने गावी स्थायिक होण्यासाठी गेलो. तेथे आम्हाला हासभास नसतानाही रामाच्या मंदिराजवळील धर्मशाळेतील जागा घर बसवण्यासाठी मिळाली. केवळ माझ्या सद्गुरूंच्या इच्छेने आणि कृपेने आम्ही इथून निघालो आणि आज तेथे रामाचे दास बनून रहात आहोत.

या सर्व अध्यात्मिक गोष्टी घडत असतानाच माझ्या पत्नीला दोन वेळा दोन वेगवेगळया ठिकाणी आलेल्या गाठींचे ऑपरेशन करावे लागले. परंतु सद्गुरूकृपेने या दोन्ही गाठी नॉर्मल निघाल्या. अशाप्रकारे त्यांनी नेहमीच आम्हाला मोठ्या संकटांमधून तारले आहे.

सद्गुरू भाऊमहाराजांनी आम्हाला मुंबई सोडताना शब्द दिला होता की “मी गावाला तुमच्या घरी नक्की येणार.” परंतु त्यांच्या देहावसानानंतर आम्हाला अतिशय पोरके वाटू लागले व सद्गुरूंनी आपल्या घरी येण्याची आपली इच्छा अर्धवट राहिल्याची खंतही वाटली. परंतु सदगुरूच ते! 'सद्गुरूंचे वाक्य ही काळ्या दगडावरची रेघच असते' हा अनुभव आम्ही दोघांनी गेल्या वर्षी घेतला. गेल्या वर्षी आमच्या गावातील गटबाजीमुळे ज्या मोठया समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मी अतिशय विमनस्क झालो होतो. मला माझ्या सद्गुरूंची अतिशय आठवण येत होती. आज ते प्रत्यक्ष असते तर मी त्यांच्याकडे जाऊन माझे मन हलके केले असते, असे वाटू लागले.

एवढयात माझे गुरूबंधू स्नेही श्री. दिपक यांचा मला फोन आला व सद्गुरू भाऊमहाराजांच्या ७५ नामस्मरण संकल्पाची यात्रा आमच्या इथे येत असल्याचे सांगितले. आम्हा दोघांना अतिशय आनंद झाला. ठरल्याप्रमाणे हे नामस्मरण करण्यासाठी श्री. व सौ. खामकर आणि त्यांच्याबरोबरचे सदगुरू भाऊंचे भक्त असे सर्व जण आमच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी आपल्यबरोबर सदगुरू भाऊमहाराजांचा फोटो व पादुका आणल्या होत्या. ते सर्व पाहून माझा पोरकेपणा कुठल्या कुठे नाहीसा झाला व सदगुरू भाऊ त्या पादुकांच्या रूपाने स्वतःचा शब्द खरा करण्यासाठी आले आहेत, या विचाराने आम्ही सद्गदित झालो. आमची गुरूमाऊली बरोब्बर गुरूवारच्या दिवशी आमच्या घरी आली होती व तेसुध्दा मला माझ्या समस्येमध्ये त्यांच्या आशीर्वादाची आत्यंतिक आवश्यकता असताना, हे आठवून आजही आमचे मन भरून येते.

सदगुरू आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपामध्ये कळकळीने स्मरण करणा-या आपल्या भक्ताला आनंद देण्यास सिध्द असतात हेच आम्ही अशाप्रकारे अनुभवले.

श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः

।। नमो गुरवे वासुदेवाय ।।

<< Previous